56782
मळेवाड बाजारपेठेमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
आरोंदा, ता. १२ ः मळेवाड बाजारपेठ परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठेत तसेच मुख्य रस्त्यांवर अनेक भटके कुत्रे दिवसभर फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीती आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, वाहनांच्या मागे धावणे तसेच पादचाऱ्यांवर भुंकणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.