56864
तपस्वी मयेकर
‘मालवण शहरात अनागोंदी कारभार’
ठाकरे शिवसेना संतप्त; स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : शहरातील कारभारात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप करत प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापन प्रश्नाविरोधात ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता नगरपरिषदेच्या समोरील जागेत उपोषणाला बसू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात श्री. मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर्यटन राजधानी असलेल्या मालवण शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मंजूर नळपाणी योजनेचे काम निविदेतील अटी व शर्तींनुसार होत नाही. या योजनेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेचे सर्वेसर्वा हे ठेकेदाराचे जवळचे नातेवाईक असल्याने योजनेवर योग्य नियंत्रण ठेवले जात नाही व कामाचा दर्जा तपासला जात नाही. यासंदर्भात ठाकरे शिवसेना व इतर नगरसेवकांनी आढावा बैठक घेण्याबाबत पत्र दिले होते; मात्र, प्रशासनाने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केलेली नाही.
शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेली भुयारी गटार योजना गेली २० वर्षे अपूर्णच आहे. ही योजना अपूर्ण का राहिली? कामाची मुदत किती होती? या योजनेसाठी शासनाकडून किती निधी प्राप्त झाला व किती खर्च झाला? याची कोणतीही माहिती स्पष्ट नाही. ठेकेदारावर वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने ठेकेदाराला सोबत घेऊन प्रशासनाने आढावा बैठक घ्यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मालवणच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या देऊळवाडा ते भरड या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर भगत यांच्या अनधिकृत बांधकामामुळे व दुकानांमुळे सतत वाहतूक कोंडी होते. याबाबत नगरसेवकांनी आवाज उठवला असता काहींकडून शिवीगाळ करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभेत यावर आवाज उठवला असता, ‘‘हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने समन्वय साधून कारवाई करू,’’ असे उत्तर दिले; मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
शहरातील घरोघरी कचरा उचलण्यासाठी पूर्वी काही लाखांत होणारा ठेका यावेळी २ कोटी रुपयांचा काढला आहे. तरीही गेल्या १० वर्षांप्रमाणेच कचरा संकलन सुरू आहे. कंत्राटदार निविदेतील अटी व शर्तींनुसार काम करत नसून, शहरात कचरा गोळा करणे व डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेण्याबाबत कसलीही जनजागृती नाही. यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही योग्य काम न करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि ठेकेदारांना मिळणारे पाठीराखेपण याविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी १५ ऑगस्टला नगरपरिषदेसमोर उपोषण करू, असे नगरसेवक मयेकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.