ग्राऊंड रिपोर्ट - लोगो
rat१२p५.jpg-
५६७६२
चिपळूण ः कोळकेवाडी धरणावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद.
rat१२p६.jpg-
५६७६३
सीसीटीव्हीचे खांब पडलेले आहेत.
--------------
धरण मोठे, यंत्रणा छोटी !
कोळकेवाडीची सुरक्षा पाच कामगारांवर; सामग्रीआधारे व्यवस्थापन
एक नजर
* धरणाच्या सांडव्याच्या देखरेखीसाठी केवळ एकच मजूर
* आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील वाहनही गायब
* अतिवृष्टीत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : तालुक्यातील कोळकेवाडी धरणाच्या सुरक्षेचा आणि व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरण व्यवस्थापन विभागाच्या अलोरे येथील कार्यालयात कायमस्वरूपी उपअभियंता नसून कोयना येथील अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार सोपवला आहे. धरणाच्या प्रत्यक्ष ठिकाणीही मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, सध्या केवळ पाच कामगारांवर धरणाच्या देखभालीसह पाण्याची पातळी, पर्जन्यमान आणि अन्य महत्त्वाच्या नोंदींची जबाबदारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात धरण व्यवस्थापनाची यंत्रणा किती सक्षम आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोळकेवाडी धरणावर पूर्वी एका शिफ्टमध्ये चार कर्मचारी कार्यरत असायचे. २४ तासांच्या तीन शिफ्टसाठी सुमारे १२ कर्मचारी कार्यरत असत. यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये टेक्निशियनचाही समावेश होता. मात्र, २००० पासून धरणाच्या ठिकाणी नवीन नियुक्त्या झाल्या नसल्याने जुने कर्मचारी व टेक्निशियन सेवानिवृत्त होत गेले आणि मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. सध्या धरणावर केवळ पाच कामगार कार्यरत असून, त्यापैकी तीन शासनाचे आणि दोन कंत्राटी कर्मचारी आहेत.
चौकट
एकाच कर्मचाऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या
धरणातील पाण्याची पातळी तपासणे, परिसरातील पावसाची नोंद घेणे, आवश्यकतेनुसार गेट उघडणे आदी कामे मर्यादित मनुष्यबळावर करावी लागत आहेत. तांबडवाडी येथील प्रवेशद्वारावरील गेट धरणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. हे गेट उघडण्यासाठी कर्मचारी तेथे गेल्यास त्या कालावधीत धरणाच्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध राहत नाही. धरण परिसरातील पर्जन्यमापक यंत्रणा कार्यालयापासून सुमारे ४० ते ५० मीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना दर तासाला तेथे जाऊन पर्जन्यमानाची नोंद घ्यावी लागते. या ठिकाणी वीजव्यवस्था नसून कर्मचाऱ्यांना बॅटरीची सुविधाही उपलब्ध नाही. पावसाची नोंद घेतल्यानंतर ती माहिती स्वतःच्या मोबाईलवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावी लागते.
चौकट
संपर्क यंत्रणाच नाही
धरणाच्या ठिकाणी स्वतंत्र संपर्क यंत्रणा उपलब्ध नसल्याने अतिवृष्टीच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर बनते. मुसळधार पावसात अनेकदा मोबाईल नेटवर्क खंडित होते. अशावेळी धरणातील पाण्याची पातळी किंवा पर्जन्यमानाची माहिती वरिष्ठांपर्यंत वेळेत पोहोचवण्यात अडचणी निर्माण होतात; मात्र, माहिती वेळेत न दिल्यास त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवरच येते. कामगारांना स्वतःच्या मोबाईलवरून सर्व नोंदी अधिकाऱ्यांना पाठवाव्या लागतात.
चौकट
सहाही सीसीटीव्ही कॅमेरे बंद
धरणाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सहा सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याची माहिती आहे. यामध्ये दोन फिरते कॅमेरे, तीन गेटवर आणि एक पाण्याची पातळी दिसेल, अशा दिशेने बसवण्यात आला आहे; मात्र, सध्या हे सर्व कॅमेरे बंद असल्याने धरण परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
चौकट
आपत्तीवेळी वाहनही उपलब्ध नाही
आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार कोळकेवाडी धरणावर एक वाहन उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्याची वेळ आली किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिसरातील गावांना सूचना देण्यासाठी अधिकारी या वाहनाद्वारे तातडीने गावांपर्यंत पोहोचू शकतात; मात्र, प्रत्यक्षात धरणाच्या ठिकाणी हे वाहन उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
चौकट
धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था
कोळकेवाडी मार्केटपासून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. या रस्त्यावरील सुमारे ५०० मीटर भागाची दोन वर्षांपूर्वी दुरूस्ती करण्यात आली होती; मात्र, हा रस्ताही पुन्हा खराब झाला असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी, कर्मचारी किंवा मदत पथकाला धरणापर्यंत पोहोचताना अडथळे निर्माण होत आहेत.
चौकट
रेनकोट, छत्री, बॅटरीचीही वानवा
धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात आवश्यक असणारे रेनकोट, छत्री आणि बॅटरी यांसारख्या मूलभूत सुविधा शासनाकडून मिळत नसल्याची तक्रार आहे. धरण परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर असतो. अशा परिस्थितीत अंधारात आणि मुसळधार पावसात पर्जन्यमान व पाण्याची पातळी तपासण्यासाठी कर्मचाऱ्यांना जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कोळकेवाडी धरणाच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्याचीही बाब समोर आली आहे. पूर्वी रत्नागिरी येथून पोलिस कर्मचारी धरणाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले जात होते; मात्र, गेल्या चार वर्षांपासून ही नियुक्ती झालेली नसल्याचे सांगण्यात येते.
कोट
कोयना प्रकल्पाच्या अंतर्गत येणारा कोळकेवाडी धरण ही राष्ट्रीय संपत्ती आहे. धरणाच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपअभियंता, आवश्यक मनुष्यबळ, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही, पथदिवे, आपत्कालीन वाहन आणि सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
- विनोद झगडे, पंचायत समिती सदस्य, अलोरे
कोट
कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागासाठी शासनाने निधीची तरतूद केली पाहिजे. कोळकेवाडी धरण ५० वर्षानंतरही मजबूत स्थितीत आहे. शासनाने आवश्यक त्या सुविधा पुरवल्या तर त्यात आम्ही धरणाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू.
- रोहन देसाई, प्रभारी उपअभियंता, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग
चौकट
यावर सातत्याने लक्ष अत्यावश्यक
* अतिवृष्टीत यंत्रणा सक्षम असणे गरजेचे
* पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी
* पर्जन्यमान, गेटची स्थिती, परिसरातील स्थिती
चौकट
या बाबी ठरताहेत गंभीर
* मनुष्यबळाची कमतरता
* संपर्क यंत्रणेचा अभाव
* बंद सीसीटीव्ही, निकामी पथदिवे
* वाहनाची अनुपलब्धता
* सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.