चर खोदून डिगसचा रस्ता
अडविला; ग्रामस्थ संतप्त
सरकारला डेडलाईन; उपोषणाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः कुडाळ तालुक्यातील डिगस घाण्याचीवाडी, सोनारगाळी ते डिगस हायस्कूल रस्ता १५ ऑगस्टपूर्वी रहदारीस खुला करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा डिगसवासीयांनी दिला आहे. स्थानिक ग्रामस्थ स्वप्नील धावले यांच्यासह सुमारे २० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे तसे निवेदनही जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, डिगस येथील घाण्याचीवाडी रस्त्याबाबत यापूर्वीही अनेकदा उपोषण, आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाढीतील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहने जाण्यासही मार्ग उरलेला नाही. ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबरला रस्ता लागून सुमारे वीस वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप या रस्त्यावर एकही रुपया खर्च केलेला नाही किंवा आम्ही दिलेल्या पत्रांना एक उत्तरही मिळालेले नाही. हा रस्ता जाणीवपूर्वक काही व्यक्तींनी रस्त्यावर चर खोदून अडविला आहे. याबाबत ग्रामपंचायत तसेच प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून न्याय मागितला आहे. मात्र, अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी १५ ऑगस्टपूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करावा. तसेच जाणीवपूर्वक चर खोदून रस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा डिगसचे ग्रामस्थ स्वप्नील धावले यांच्यासह बापू धावले, सुरेश शिरोडकर, प्रकाश गोसावी, कैलास गोसावी, पुरुषोत्तम कुबल, संदीप पालव, पुंडलिक परब आदींनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.