मासेमारी बंदीला ‘रात्रीचा’ सुरुंग?
नियम पाळणाऱ्यांमध्ये नाराजी; तपासणीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः सागरी मासेमारीवर बंदीचा कालावधी सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील काही भागांत रात्रीच्यावेळी अनधिकृतपणे मासेमारी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाभोळ आणि हर्णे बंदर वगळता इतर काही भागांत रात्रीच्या सुमारास समुद्रात मासेमारी नौका जात असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे नियमांचे पालन करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन १ जून ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आली होती. पुढे ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे; मात्र, या कालावधीतही काही ठिकाणी रात्री समुद्रात गेलेल्या नौका पहाटे किनाऱ्यावर परतताना दिसत असून, ही मासळी थेट स्थानिक बाजारात विकली जात आहे. त्यामुळे बंदीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमित मासेमारी बंद असतानाही जिल्ह्यातील काही मासळी मार्केटमध्ये ताजी समुद्री मासळी उपलब्ध होत आहे. ही मासळी नेमकी कुठून येते, कोणत्या नौकांमधून उतरवली जाते आणि तिची वाहतूक कुणाच्या परवानगीने होत आहे, याची सखोल तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
---
कोट १
बंदीच्या काळात मासेमारी करण्यामागे नेमके कोण आहे ? याचा उलगडा प्रशासनाने तपासणी केली पाहिजे. सर्वांसाठी नियम समान असून, त्यांची अंमलबजावणीही समान झाली पाहिजे. काहींना सूट आणि काहींवर बंदी असे चित्र असल्यास असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.
-नंदकुमार चौगुले, मच्छीमार, हर्णै
---
कोट २
समुद्रात जाणाऱ्या संशयित नौकांची पाहणी करणे आणि बाजारातील मासळीचा स्रोत तपासणे, ही मत्स्य व्यवसाय विभागाची जबाबदारी आहे. विभागाने या कथित अनधिकृत मासेमारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी जेणेकरून मच्छीमारांमधील नाराजी दूर होईल.
-संदीप कांबरे, मच्छीमार, अंजनवेल