पैसा बोलतो, आपण ऐकतो?...........लोगो
(७ ऑगस्ट टुडे ३)
विमा म्हणजे गुंतवणूक नाही...
विम्याचा विचार करताना ‘मला परत काय मिळणार?’ या प्रश्नाऐवजी ‘संकट आलं तर माझं किती नुकसान वाचणार?’ हा प्रश्न विचारायला हवा. गुंतवणूक पैसा वाढवते; विमा पैसा वाचवतो. संरक्षणाला नफा समजण्याची चूक केली की, दोन्ही हातातलं निसटण्याची शक्यता वाढते.
- rat१३p३.jpg-
26O57009
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
---
‘ही पॉलिसी घ्या. विमाही मिळेल आणि गुंतवणूकही. हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असेल. विमा म्हणजे गुंतवणूक ही आपल्या देशात लोकप्रिय असणारी एक अद्भुत आर्थिक कल्पना आहे; पण आर्थिक जगात आकर्षक कल्पना आणि योग्य तत्त्व यांच्यात अनेकदा फरक असतो. आपण प्रीमियम भरतो मग बदल्यात काहीतरी मिळायला हवं, अशी अपेक्षा तयार होते; पण नेमकी हीच अपेक्षा विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत निर्माण करते. विम्याचा उद्देश संरक्षण आहे, गुंतवणुकीचा उद्देश संपत्ती निर्माण करणे आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत; पण दोन्हींचं काम वेगळं आहे. हा फरक समजून घेण्यासाठी गाडीचं उदाहरण उपयोगी पडतं. गाडीतील ॲक्सिलेरटरचं काम गाडी पुढे नेणं असतं तर ब्रेकचं काम गरज पडली तर गाडी थांबवणं असतं. ॲक्सिलरेटरकडून आपण गाडी थांबवण्याची अपेक्षा करत नाही आणि ब्रेककडून गाडीचा वेग वाढवण्याची अपेक्षा करत नाही. गुंतवणूक ही ॲक्सिलरेटरसारखी आहे; ती संपत्ती वाढवण्यासाठी असते. विमा हा ब्रेकसारखा आहे, तो संकटात आर्थिक नुकसान अनियंत्रित होऊ नये म्हणून असतो. जर ब्रेकला ॲक्सिलरेटर समजलं किंवा ॲक्सिलरेटरला ब्रेक समजलं तर गाडी धोक्यात येते. आर्थिक नियोजनातही हेच घडतं.
विमा आणि गुंतवणूक एकच असतील तर आरोग्यविम्यातून किती परतावा मिळतो? गाडीच्या विम्यातून किती मॅच्युरिटी व्हॅल्यू मिळते? उत्तर स्पष्ट आहे काहीच नाही; पण म्हणून आरोग्यविमा किंवा वाहनविमा निरूपयोगी होत नाही. कारण, त्यांचं काम नफा देणं नाही मोठं नुकसान टाळणं आहे. समजा, एखाद्या कुटुंबाने आरोग्यविम्यासाठी वर्षाला २५ हजार रु. प्रीमियम भरला आणि त्या वर्षी कोणताही वैद्यकीय खर्च आला नाही तर वरकरणी २५ हजार खर्च झाले असं वाटू शकतं; पण अचानक शस्त्रक्रिया झाली आणि आठ लाखांचा रुग्णालय खर्च आला तर तोच विमा कुटुंबाची अनेक वर्षांची बचत वाचवू शकतो म्हणजे विम्यातून परतावा मिळाला नाही; पण संभाव्य मोठं नुकसान टळलं. हा विम्याचा खरा आर्थिक उपयोग आहे.
वाहनविम्याचंही तेच आहे. वर्षभर गाडीला काही झालं नाही म्हणून प्रीमियम परत मिळत नाही; पण मोठा अपघात झाला, गाडीचं नुकसान झालं किंवा थर्ड पार्टी लायाबिलिटी निर्माण झाली तर विमा मोठा आर्थिक धक्का कमी करू शकतो. त्यामुळे विमा हा नफा देणारा असेट नसतो; तो नुकसान मर्यादित ठेवणारी सेफटी सिस्टिम असते. जीवनविम्याचं तत्त्वही यापेक्षा वेगळं नाही. फरक एवढाच की जीवन विम्याच्या बाबतीत ‘प्रीमियम परत मिळेल’, ‘मॅच्युरिटी मिळेल’, ‘बोनस मिळेल’ अशा शब्दांनी संरक्षणाचा मूळ हेतू मागे ढकलला जातो.
समजा दोन व्यक्ती दरवर्षी ५० हजार रुपये भरतात. पहिली व्यक्ती शुद्ध टर्म प्लॅन घेते आणि तुलनेने मोठं जीवन संरक्षण मिळवते. दुसरी व्यक्ती ‘विमा + गुंतवणूक’ अशा मिश्र उत्पादनात पैसे भरते. दुसऱ्या व्यक्तीला काही वर्षांनी मॅच्युरिटी व्हॅल्यू मिळेल, हा दिलासा असतो; पण त्याच प्रीमियममध्ये मिळणारं जीवन संरक्षण अनेकदा खूपच कमी असतं म्हणजे मोठी अनिश्चित घटना घडली तर कुटुंबाला मिळणारी रक्कम प्रत्यक्ष गरजेच्या तुलनेत अपुरी पडू शकते. इथे समस्या परतावा कमी-जास्त असण्याची नाही; समस्या अशी आहे की, संरक्षणाचा मुख्य उद्देशच मागे पडतो म्हणून आर्थिक नियोजनात प्रत्येक रुपयाचं काम स्पष्ट असावं लागतं. काही रुपये संरक्षणासाठी असतात, काही बचतीसाठी, काही गुंतवणुकीसाठी आणि काही दैनंदिन खर्चासाठी. संरक्षणासाठी दिलेल्या रुपयाला नफा मागितला आणि गुंतवणुकीच्या रुपयातून संरक्षण अपेक्षित ठेवलं की, दोन्हींचा उद्देश बिघडतो. प्रथम पुरेसं जीवन संरक्षण शुद्ध टर्म प्लॅनमधून घ्यायचं, आरोग्यविमा वेगळा ठेवायचा आणि गुंतवणूक उद्दिष्ट, कालावधी, जोखीम आणि लिक्विडिटी पाहून करायची हा मूलभूत क्रम अधिक स्पष्ट आणि परिणामकारक ठरतो. पुढील काही लेखांत आपण पैशाकडे पाहण्याची ही मानसिक चौकट समजून घेऊ कारण, आर्थिक स्थैर्याची सुरुवात व्यवहारातून नव्हे तर विचारातून होते.
(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.