कोकण

नवी आव्हाने पेलण्यासाठी मच्छीमार सज्ज

CD

swt१३८.jpg
५७०५२
देवगड ः येथील किनारी भागात मच्छीमारांची धांदल सुरू होती. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

नवी आव्हाने पेलण्यासाठी मच्छीमार सज्ज
बंदी उठण्याची प्रतीक्षा : इंधन दरवाढ, परप्रांतीय ट्रॉलर्सचे आव्हान
​संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः पावसाळी बंदी कालावधीनंतरच्या यंदाच्या मासेमारी हंगामाची आता चाहूल लागली आहे. नवा हंगाम... नवा जोश... नवी आशा आणि नव्या उमेदीसह स्थानिक मच्छीमारांची किनारी भागातील लगबग वाढली आहे. इंधनाचे वाढलेले दर, दरवर्षी सतावणारी परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी ही प्रमुख आव्हाने यावर्षी असणार आहेत. मागचे पान पलटून मच्छीमार यंदाच्या नव्या हंगामाची स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन समुद्रावर स्वार होण्याच्या तयारीत आहेत.
​राज्यातील वाढीव मच्छीमारी बंदी कालावधीचा आता काउंटडाऊन सुरू झाला असल्याने मच्छीमारांची नव्या हंगामाच्या दृष्टीने तयारी सुरू होती. पावसाळी डागडुजीनंतर मच्छीमारी नौका पाण्यात उतरण्यासाठी सज्ज झाल्या असून बंदी कालावधी संपताच हवामान बदलाबाबत सावधगिरी बाळगून समुद्राच्या दिशेने कूच करण्याची तयारी ठेवली आहे.
​यंदा मे महिना संपून जून उजाडला तरीही पावसाची चिन्हे काही दिसत नव्हती. अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास काहीसा विलंब झाला. पावसाळ्यात साधारणपणे १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६१ दिवसांचा मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी असतो. पर्यायाने पाऊस सुरू झाला नसला तरीही मच्छीमारांना आपल्या नौका पाण्याबाहेर काढून पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती.
​मासेमारी बंदी काळात खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. यंदा उन्हाळी हंगामात अखेरच्या टप्प्यापर्यंत मासेमारी करण्याला मच्छीमारांना निसर्गाने साथ दिली होती. तरीही नेहमीच्या अनुभवातून काही मच्छीमारांनी वेळेआधीच मासेमारीचा शेवट करून आपल्या नौका किनाऱ्यावर घेतल्या होत्या.
​स्थानिक वेळेचे नियोजन, पाण्याच्या भरतीच्या वेळा पाहून मच्छीमार आपल्या नौका किनारी भागात सुरक्षितस्थळी घेतात. त्यानंतर मासेमारी जाळी स्वच्छ पाण्यात धुऊन वाळवणे, नौकांची पावसापासूनच्या सुरक्षिततेसाठी शाकारणी करणे, पावसाळी डागडुजीची कामे करणे यांसह बाहेरील मच्छीमार आपापल्या गावी जाण्यासाठी तयारी सुरू करतात. पर्यायाने मे अखेरीसच मासळी हंगामाचे खऱ्या अर्थाने सूप वाजते.
​नेहमीच्या अनुभवानुसार मासेमारी बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत असला, तरी यंदा त्यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या हद्दीतील मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सद्यस्थितीत राज्याच्या हद्दीत मासेमारी बंदी कालावधी कायम आहे.
​आता मासेमारी बंदी कालावधी संपण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक असल्याने किनारी भागात नव्या हंगामाची चाहूल लागली आहे. त्याअनुषंगाने किनारी भागात स्थानिक मच्छीमारांची लगबग वाढली आहे. नौका मालकांनी आपल्या ट्रॉलरची पावसाळी डागडुजी करून नौका नव्या हंगामासाठी सज्ज केल्या आहेत. परंतु, मच्छीमारांची सारी भिस्त पुढील वातावरणावर अवलंबून आहे. समुद्री भागातील वातावरण चांगले राहिल्यास मच्छीमारांसाठी ही समाधानाची बाब ठरण्याची शक्यता आहे.
​सद्यस्थितीत किनारी भागातील पावसाचे प्रमाण कमी आहे. समुद्रही तसा शांतच आहे. किनारी भागातील वातावरण स्वच्छ होते. त्यामुळे मच्छीमारांनी या संधीचा लाभ घेत नव्या हंगामाला प्रारंभ करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, काही मच्छीमार नारळी पौर्णिमा किंवा श्रीगणेश चतुर्थीनंतरच नव्या हंगामाची सुरुवात करतील, असेही चित्र होते.

चौकट
​नौकांची सज्जता
पावसाळी शाकारणी उतरवून नौकांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. नौकांच्या पाण्यातील भागाच्या सुरक्षिततेसाठी रंग काढण्याचे काम सुरू आहे. काहींनी नौका पाण्यात उतरवण्यासाठी संपूर्ण सज्जता केल्याचे किनारी भागातील चित्र आहे. नौकांवरील परराज्यातील मच्छीमार, खलाशी किनारी भागात दाखल होत आहेत. पावसाळी बंदी उठल्यानंतर तातडीने हवामानाचा अंदाज घेऊन नौका समुद्राच्या पाण्यात झेपावण्याची तयारी ठेवण्यात आली होती. नौका पाण्यात उतरवून सज्जता ठेवण्यात येणार आहे. बंदी कालावधी संपताच मासेमारीला प्रारंभ होईल, असे सद्यःचित्र आहे.

चौकट
​पहिल्या कॅचसाठी धडपड
आता मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात येण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक असल्याने बंदी कालावधी संपताच पावसाळ्यानंतरची ''पहिली कॅच'' मिळवण्यासाठी मच्छीमार सज्ज आहेत. यासाठी नौका खाडीच्या पाण्यात उतरवून सज्जता ठेवली जात आहे. सुरुवातीला चांगली मासळी मिळण्याची मच्छीमारांना आशा आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम समाधानकारक असावा, असे साकडे मच्छीमार घालीत आहेत.

चौकट
​इंधन दराची चिंता
सद्यस्थितीत मच्छीमारांना वाढलेल्या इंधनाच्या दराची चिंता आहे. खुल्या बाजारातील इंधनाचे दर आणि मच्छीमारांसाठीच्या इंधनाचे दर यामध्ये सध्या मोठी तफावत आहे. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी विविध पातळीवर मच्छीमारांचे प्रयत्न सुरू आहेत. वाढलेल्या इंधनामुळे मासेमारी करताना वाढीव दराचा सामना करावा लागण्याची शक्यता मच्छीमार वर्तवत आहेत. सद्यस्थितीत मच्छीमारांसाठीच्या डिझेलचा दर सुमारे १३९ रुपये प्रतिलिटर इतका आहे. यातून सुमारे २२ रुपये इतका परतावा येईल, तर खुल्या बाजारात डिझेलचा दर सुमारे १०० रुपये प्रतिलिटर इतका आहे. त्यामुळे परतावा गृहीत धरला तरीही एकूणच इंधनाचा दर वाढीव असल्याचे मच्छीमार सांगतात.

​कोट
​यंदाच्या नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात करण्याच्या तयारीत स्थानिक मच्छीमार आहेत. १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कालावधी असून त्यानंतर खऱ्या अर्थाने मासेमारीला प्रारंभ होईल. किनारी भागातील हवामानाचा अंदाज घेऊन मच्छीमार समुद्रात जातील. परंतु, सद्यस्थितीत मच्छीमारांना इंधन दराची समस्या भेडसावत असून हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.
- ज्ञानेश्वर खवले, स्थानिक मच्छीमार

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT