बिग स्टोरी
rat१६p२४.jpg-
५७५३७
राजापूर ः घाटमार्गामध्ये कोसळलेली दरड.
rat१६p२५.jpg-
५७५३८
राजापूरः अणुस्कुरा घाट मार्गावर पडलेले खड्डे.
rat१६p२६.jpg-
५७५३९
राजापूरः अणुस्कुरा घाटातील नागमोडी वळणे.
rat१६p२७.jpg
५७५४०
राजापूर ः घाटमार्गाचे सुरू असलेले सर्व्हेक्षण.
rat१६p२८.jpg-
५७५४१
राजापूरः आंबा घाट बंद झाल्यामुळे अणुस्कुरा घाटात वाहनांच्या रांगा
----------
आंबा घाटाला हवा सुरक्षित पर्याय !
व्यापारी, पर्यटकांसह नियमित प्रवास सुखकर; विकासासाठी साडेतीनशे कोटी मंजूर
इंट्रो
आंबा घाटात सध्या आलेले विघ्न, त्यावर उपाययोजना करण्यास लागणारा विलंब ही स्थिती रत्नागिरीचा एकप्रकारे आर्थिक, बाजारपेठीय दृष्टीने कोंडी करणारी आहे. आंबा घाटाच्या मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना कोल्हापूरला जोडणारा मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. या मार्गाची आवश्यकता यामुळे अधोरेखित होते. सध्याच्या रत्नागिरीच्या अडचणीच्या काळात अणुस्कुरा घाट उत्तम स्थितीत राखणे याला महत्त्व आहे. अणुस्कुरा घाटाची डागडुजी, रुंदीकरण, मजबुतीकरण, पायाभूत सुविधांची वाढ तातडीने करण्याची वेळ आली आहे. यासाठी कागदी घोडे न नाचवता काम सुरू झाले पाहिजे. दळणवळणाची कोंडी फोडण्यासह इतर फायदेही आहेतच. सध्याच्या काळात धोरणातील दूरदृष्टी अपेक्षित आहे. या ३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि मोऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी ३५० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आंबा घाटाला सुरक्षित पर्यायाची आशा निर्माण झाली आहे....!
- राजेंद्र बाईत, राजापूर
दूरदृष्टीने आखलेला अणुस्कुराचा पर्याय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या मध्यवर्ती वसलेल्या राजापूर तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ये-जा करण्यासाठी नव्वदीच्या दशकामध्ये अणुस्कुरा घाटमार्ग तयार करण्यात आला. ओणी-रायपाटण-पाचल-येरडव-करक- पांगरी-अणुस्कुरा असा घाटरस्त्याला माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (कै.) ल. र. तथा भाई हातणकर यांच्या कार्यकाळामध्ये प्रत्यक्षात मूर्तस्वरूप मिळाले. नागमोड्या वळणांच्या या रस्त्याने कमी कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात जाणे सहजसोपे केले. त्यामुळे ‘शॉर्टकट’ म्हणून अणुस्कुरा घाटमार्गाला अधिक पसंती मिळू लागली. कोल्हापूरसह घाटमाथा परिसरातील बाजारपेठेतून घाऊक प्रमाणात किराणा माल, विविध कडधान्य, कापड दुकानातील साहित्य, बांधकामासाठी लागणारे साहित्य यांसह अन्य साहित्याची राजापूर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. घरोघरी आणि हॉटेलमध्ये दैनंदिन मागणी असलेल्या नाशवंत मालापैकी दुधासह भाजीपालाही मोठ्या प्रमाणात कोल्हापूर भागातून येतो. एकंदरीत, घाटमार्गामुळे कोल्हापूरची घाऊक बाजारपेठ कोकणासाठी खुली झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात दरदिवशी कोट्यवधीच्या मालाची आवक होत आहे.
आपत्तीकाळात पर्यायी मार्ग
कोल्हापूरहून रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि अणुस्कुरा घाट हे मार्ग आहेत. याचा उपयोग सिंधुदुर्गसह गोवा राज्याकडे जाण्याचा मार्ग म्हणूनही पाहिले जाते. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत दरडी कोसळून आंबा घाटमार्ग वाहतूकीसाठी बंद झाला होता. त्या वेळी अणुस्कुरा घाटमार्ग हा एकमेव पर्यायी मार्ग ठरला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याच्यादृष्टीने अणुस्कुराचे महत्व अधोरेखित झाले. त्यानंतर २०२४ सह यंदाही आंबा घाटमार्ग तात्पुरत्या काळात बंद झाल्याने अणुस्कुराचे महत्व पुन्हा लक्षात आले आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटाच्या रूंदीकरणाचे महत्व राज्याच्या सत्ताधाऱ्यांनाही लक्षात आले आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गासह मिऱ्या-कोल्हापूरचे रखडलेले काम पाहता मुंबईहसह पुण्यातील प्रवाशांना मुंबई-पुणे-कोल्हापूर-अणुस्कुरा घाट-राजापूर या पर्यायी मार्ग पर्याय म्हणून उपयुक्त ठरत आहे. याचा सर्वाधिक फायदा अवजड वाहतुकीला झालेला आहे.
पर्यटकांसाठी पर्वणी
नागमोड्या वळणाच्या अणुस्कुरा घाटातून प्रवास करताना दाट धुक्याने लपेटलेले आणि हिरवाईने नटलेले डोंगर, उंचावरून फेसाळत कोसळणारे पांढऱ्याशुभ्र पाण्याचे धबधबे, घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेले निळाशार पाण्याने भरलेले विस्तीर्ण अर्जुना धरण असा अलौकिक निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्याचा मोह प्रवाशांसह पर्यटकांना आवरता येत नाही. या सार्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी घाटमार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ‘पिकनिक स्पॉट’ परिसरामध्ये प्रवासी, पर्यटक काहीकाळ थांबतात. काही हौशी पर्यटकांची अणुस्कुरा घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी घाटमार्गामध्ये सतत वर्दळ असते.
ऐतिहासिक पायवाटा, शिलालेख अन् ऐतिहासिक ठेवा
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणाऱ्या अनेक पायवाटा आहेत; मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली राजापुरातील येरडव ते अणुस्कुरा ही ऐतिहासिक शिवकालीन पायवाट. शिवकाळामध्ये रहदारी असलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मोघली सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली आल्याचे सांगितले जाते; मात्र, सद्यःस्थितीमध्ये रहदारी नसल्याने या पायवाटेसह पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखांचे अधिकार असल्याचे निर्देश करणारा सुमारे दीडशे-दोनशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी ऐतिहासिक ठेवा काहीसा दुर्लक्षित राहिला.
ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्ता खड्डेमय
मुंबई-गोवा महामार्ग आणि अणुस्कुरा घाटमार्ग यांना जोडणारा ओणी-पाचल-अणुस्कुरा या सुमारे ३० कि.मी.च्या अंतरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकवेळा अवजड वाहने उलटण्याचेही प्रकार घडत असून अपघातही होत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत असते. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी पावसापुढे टिकावत धरत नाही. त्यातही काम दर्जेदार नसल्याने दरवर्षी लाखो रुपयांचा निधी वाया जातो.
दरडी, भुस्खलन रोखण्याचे आव्हान
पावसाळ्यात अणुस्कुरा घाटात दरडी आणि भलेमोठे दगड कोसळण्याचे प्रकार घडतात. विशेषतः घाटमाथ्यावरील ३ किलोमीटरचा परिसर अत्यंत धोकादायक आहे. या भागात कातळाचा (दगडाचा) भाग जास्त असून, उंचच्या उंच सुळक्यासारख्या दरडी आहेत. या धोकादायक स्थितीतून प्रवास करावा लागतो. तसेच मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘पिकनिक स्पॉट’ परिसरातही भूस्खलनाचे प्रकार घडलेले आहेत. हा परिसर सुरक्षित करणे हे आव्हान आहे.
निधी सिंचनामुळे विकासाला चालना
विद्यमान सरकारने ओणी-रायपाटण-पाचल-अणुस्कुरा या रस्त्याच्या मजबुतीकरण अन् काँक्रिटीकरणासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी सतत पाठपुरावाही केला. त्याला यश आले असून ३५ कि.मी. लांबीच्या या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, पुलांसह मोऱ्यांचे मजबूतीकरण आणि अन्य कामे केली जाणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण सध्या सुरू आहे. आराखड्याला शासनस्तरावर मंजुरी मिळल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. नागमोडी वळणे कमी होऊन रस्ता रूंद होणार आहे. हा रस्ता प्रत्यक्षात येण्यासाठी अजून काही वर्षे जातील. परंतु, हा मार्ग वेळेत झाला तर त्याचा फायदा निश्चिती विकासाला चालना देणारा ठरू शकतो.
दृष्टिक्षेपात ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्ता
* ओणी-पाचल-अणुस्कुरा सुमारे २६ कि.मी. लांबीचा रस्ता
* खड्डयांमुळे सध्या रस्त्याची दुरवस्था
* कारवली-रायपाटण-येळवण-खडीकोळवण-सौंदळ-ओणी येथे नागमोडी वळणे
* रूंदीकरण, मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, पूलांसह मोऱ्यांचे मजबूतीकरण आवश्यक
* नागमोडी वळणे कमी झाल्यास अपघात घटतील
* काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यातील खड्ड्यातील प्रवास होईल सुरक्षित
चौकट १
दिवसाला ९०० ट्रकची होते वाहतूक
अणुस्कूरा घाटातून दरदिवशी ३५० ते ४०० हून अधिक वाहनांची ये-जा सुरु असते. आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर कोल्हापूर-अणुस्कूरा-राजापूर या मार्गावर मालवाहतूक ट्रकसह एस.टी. गाड्या मिळून दररोज सुमारे ८०० ते ९०० गाड्या अणुस्कूरा घाटमार्गे प्रवास करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात अणुस्कूरा घाटमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये ८ ते १० पटींनी वाढ होते.
चौकट २
अणुस्कूराला पर्यायी मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक
अणुस्कूरा घाट बंद झाल्यास राजापूर-ओणी-पाचल-तळवडे-मूर-नेर्ले-तिरवडे-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाचा अवलंब केला जातो. पाचल-अणुस्कूरा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ७० किमी. आहे. तर, पाचल-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर हे सुमारे ९० किमी अंतर होते. त्यामुळे वाहनचालकांना पाचल-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर असा सुमारे २० किमीचा जादा प्रवास करावा लागतो. हा प्रवास वेळ आणि पैशाच्यादृष्टीने खर्चिक ठरतो.
कोट १
आंबा घाटाला पर्यायी मार्ग सुरक्षित असावा, यासाठी अणुस्कुरा-पाचल-ओणी या मार्गासाठी ३५० कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा केला होता. या मार्गाचे रूंदीकरण केले जाणार असून सध्या सर्व्हेक्षण सुरू आहे.
- प्रमोद कांबळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
कोट २
आंबा घाट खचल्याने सध्या अणुस्कुरा घाटाला महत्व आले आहे. मुंबई- गोवा महामार्गाचे काम अपुरे असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतुकीसाठी पर्यायी आणि जवळच्या मार्गाचा अवलंब प्रवासी करीत आहेत. त्यात अणुस्कुराला अधिक पसंती आहे. मात्र खड्ड्यांमुळे हा प्रवास अधिक त्रासदायक होत आहे.
- विनायक सक्रे, पाचल
कोट ३
अणुस्कूर घाटात पावसाळ्यामध्ये दरडींचा धोका सतत असतो. दरड कोसळून रस्त्यामध्ये माती आणि दगड येवून रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग असले तरीही, ते खर्चिक ठरतात. प्रतिकूल परिस्थितीत ओणी-पाचल-अणुस्कूरा घाटमार्गाने प्रवास करणे नकोसे होते. त्यामुळे घाटमार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.
- अमोल गुरव, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.