रसायनशास्त्र दिनानिमित्त ‘गोगटे’त स्पर्धा
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये प्रतिकृती साकारणे आणि पोस्टर बनवण्याची स्पर्धा आयोजित केली प्रतिकृती आणि पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्रातील विविध संकल्पना मांडल्या. यामध्ये हरित रसायनशास्त्र, फ्युएल सेल, अन्न, शेती, औषधनिर्मिती, पेट्रोलियम अशा विविध क्षेत्रातील रसायनशास्त्राचा वापर, मेटल ऑरगॅनिक पदार्थ, फ्युएल सेल अशा अलीकडच्या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती व व पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण केले. फिनोलेक्स कॉलेजचे प्रा. डी. डी. जोशी आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व्ही. टी. केळकर यांनी या परीक्षण केले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘रोटरी मॅरेथॉन’मध्ये सती विद्यालयाचे यश
चिपळूण ः रोटरी क्लब चिपळूणतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयातील खेळाडूंनी विविध वयोगटांत उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात आराध्या कदम हिने द्वितीय, १२ वर्षांखालील मुलांच्या गटात आराध्य कुळे याने तृतीय याशिवाय १५ वर्षांखालील मुलांच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वयोगटात वीर मेटकर याने सर्व स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक विजय कासार व पर्यवेक्षिका संजाली सावंत यांच्यासह क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
श्रावण सोमवारी शिवसेनेतर्फे खिचडी वाटप
चिपळूण : पवित्र श्रावण सोमवारनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गोवळकोट विभागाच्यावतीने श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी मंदिराच्या पटांगणात भाविकांसाठी खिचडी वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. या वेळी शहरप्रमुख सचिन (भैया) कदम, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, नगरसेविका कांचन शिंदे, वैशाली कदम, नगरसेवक अजय भालेकर, उपशहरप्रमुख राजू विखारे, विभागप्रमुख प्रकाश गांगण, उपविभागप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, दीपक कदम, प्रकाश इचले, अमर शिंदे, बाबा टाकळे, पिंट्या कोवळे, उपेंद्र हरवडे, महेश हरवडे आदी उपस्थित होते.
कुडुक खुर्द शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
मंडणगड ः शाळा माझी, मी शाळेचा हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडुक खुर्द क्र. १ येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी शाखा क्र. १, कुडुक खुर्द यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या नियोजनातून झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळेच्या भौतिक गरजा लक्षात घेऊन ग्रामस्थ बबन साळवी यांनी शाळेसाठी लोखंडी कपाट भेट दिले. तसेच गजानन पवार यांच्यावतीने शाळेला सागवानी दरवाजा बसवून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.