देवळी समाजातर्फे
रविवारी गुणगौरव
कुडाळ ः देवळी समाज हितवर्धक मंडळ कुडाळ शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा रविवारी (ता. २३) सकाळी १० वाजता येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये आयोजित केला आहे. यामध्ये नीट परीक्षा २०२५ आणि २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पाचवी व सातवी स्कॉलरशिप उत्तीर्ण विद्यार्थी, दहावी, बारावी पंधरावी झालेले विद्यार्थी, पदवीधर, संगीत, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. देवळी समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केले आहे.
..................
''आगार व्यवस्थापक
पद तत्काळ भरा''
सावंतवाडी ः येथील एसटी आगार व्यवस्थापकपद अद्यापही रिक्त आहे. यापूर्वीचे व्यवस्थापक नीलेश गावित यांची बदली ठाणे येथे होऊन २० दिवस उलटून गेले तरीही या रिक्तपदी अद्यापही कोणाची नियुक्ती झालेली नाही. बसस्थानक व आगाराचा डोलारा स्थानकप्रमुख गौतमी कुबडे यांच्याकडे सोपविला आहे. सावंतवाडी आगार व बसस्थानक हे जिल्ह्यातील उत्पन्न देणारे व गोवा, कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारे आहे. त्यामुळे या बसस्थानकातून मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मोठे आगार हाताळताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी भागातील भाविक व चाकरमानी येतात. गणेशोत्सवासाठी आगारातर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले जाते. यासाठी आगार व्यवस्थापकपद भरणे गरजेचे आहे. याचा गांभीर्याने विचार करून एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून आगार व्यवस्थापकपदी नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
..................
कणकवलीत सप्टेंबरला
जन्माष्टमी महोत्सव
कणकवली ः आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य कृष्ण कृपामूर्ती ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभूपाद यांच्या प्रेरणेतून इस्कॉन, कणकवलीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन ६ सप्टेंबरला करण्यात आले आहे. गणपती साना रोड येथील चौंडेश्वरी मंदिर हॉल, कणकवली येथे हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा होणार आहे. महोत्सवात सायंकाळी ५ वाजता कीर्तन, ६ वाजता अभिषेक, ७ वाजता कथा, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून निर्मलचंद्र प्रभू मार्गदर्शन करणार आहेत.
...................
ओटवणेत रविवारी
रक्तदान शिबिर
ओटवणे ः येथील चॅरिटेबल ग्रुप आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्यावतीने रविवारी (ता. २३) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ओटवणे गावठणवाडी कुळघर येथील दादा स्मृती रंगमंचावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक रक्तदात्यांनी जयगणेश गावकर, पोलिसपाटील शेखर गावकर आणि गावप्रमुख रवींद्रनाथ गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सचिव बाबली गवंडे आणि ओटवणे चॅरिटेबल ग्रुपने केले आहे.
....................
कणकवलीत उद्यापासून
श्रावणमेळा कार्यक्रम
कणकवली ः येथील यंगस्टार मित्रमंडळातर्फे देव काशीविश्वेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त येथील भालचंद्र महाराज संस्थान येथे ‘श्रावणमेळा’ आयोजित केला आहे. शनिवारी (ता. २२) दुपारी ३ वाजता रानभाजीची पाककला स्पर्धा, रविवारी (ता. २३) दुपारी ३ वाजता पाचवीपर्यंतच्या लहान व मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, त्यानंतर भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन तसेच उत्तेजनार्थ यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपली नावे प्रियाली कोदे, साक्षी वाळके यांच्याकडे नोंदवावीत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यंगस्टार मित्रमंडळातर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.