ओरोसमधील बॅरिकेड्स निकृष्ट ः योगेश तावडे
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. 20 : सिंधुदुर्गनगरी व ओरोस परिसरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांवर बसविलेले बॅरिकेड्स निकृष्ट व कमकुवत दर्जाचे आहेत. यामुळे भरधाव वाहने ते तोडून थेट सर्व्हिस रोडवर येत आहेत. याठिकाणी तातडीने उच्च दर्जाचे क्रॅश बॅरिअर्स अथवा आरसीसी बॅरिअर्स बसवावेत, अशी मागणी ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
श्री. तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सिंधुदुर्ग-सावंतवाडी प्रकल्प अंमलबजावणी घटकाच्या प्रकल्प संचालकांना याबाबत निवेदन दिले आहे. ओरोस परिसरातील महामार्गावर अत्यंत धोकादायक वळणे असून या वळणांवरून जाणाऱ्या वाहनांचा वेग अनेकदा अनियंत्रित असतो. महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादित करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहने रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेड्स तोडून सर्व्हिस रोडवर येत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. महामार्ग आणि सर्व्हिस रोड वेगळे करण्यासाठी सध्या बसविलेले लोखंडी बॅरिकेड्स कमकुवत आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे. अपघातग्रस्त अथवा भरधाव वाहनाची धडक सहन करण्याची क्षमता या बॅरिकेड्समध्ये नसल्यामुळे वाहने ते सहज तोडून सर्व्हिस रोडवर येतात. यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालक विनाकारण अपघाताच्या धोक्यात सापडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व्हिस रोडवरील प्रवासही असुरक्षित बनल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.
चौकट
गतीरोधकाची मागणी
ओरोस येथील धोकादायक वळणांवर मजबूत आणि उच्च दर्जाचे ''हाय-क्वालिटी क्रॅश बॅरिअर्स'' किंवा आरसीसी बॅरिअर्स बसवावेत. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी योग्य ठिकाणी गतीरोधक, रम्बल स्ट्रिप्स आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावावेत. सर्व्हिस रोडच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन आवश्यक दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही श्री. तावडे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.