58539
‘ती’ तेरा गावे इको सेन्सिटिव्हच
दोडामार्ग संदर्भातील संभ्रम दूर; अवैध वृक्षतोडीवर यंत्रणेची नजर
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २० : पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह गावे निश्चित करण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतून दोडामार्ग तालुका वगळता असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या तालुक्यातील १३ गावे याआधीच इको सेन्सिटिव्ह झाली आहेत. या गावामधील वृक्षतोडी बाबत निर्बंधांचे कडक पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासना तर्फे जारी केलेल्या आवाहनामुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २७ जुलैला जारी केलेल्या अधिसूचनेत पश्चिम घाटातील संभाव्य इको सेन्सिटिव्ह करण्यात येणाऱ्या गावांची यादी जाहीर करत यासाठीच्या हरकती मागवल्या होत्या. यात कोकणातील सर्वाधिक जैव संपन्न असलेला दोडामार्ग तालुका वगळला होता. यावरून पर्यावरण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती; मात्र सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावे वाघाचा कॉरिडॉर असल्याने याआधीच इको सेन्सिटिव्ह जाहीर झाली होती. यासाठी वनशक्ती या संस्थेने याचिका दाखल करत उच्च न्यायालयातून न्याय मिळवला होता; मात्र दोडामार्ग तालुका नव्या अधिसूचनेतून वगळल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रशासनाच्या वतीने या संवेदनशील क्षेत्रातील वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामुळे हा संभ्रम पूर्णपणे दूर झाला आहे.
संबंधित दोडामार्ग तालुक्यातील तेरा आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ गावे आधीच इको सेन्सिटिव्ह झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यात म्हटले आहे की,उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्र. १९८/२०१४ सह १७९/२०१२ मध्ये ५ डिसेंबर २०१८ व २२ मार्च २०२४ ला दिलेल्या आदेशान्वये पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी २४ फेब्रुवारीला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावित अधिसूचनेमध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५ गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.सावंतवाडी तालुक्यातील असनिये, पडवे-माजगाव, भालावल, तांबुळी, सरमळे (नेवलीसह), दाभिळ, ओटवणे, कोनशी, घारपी, उडेली, केसरी व फणसवडे तसेच दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, उगाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली व फुकेरी या गावांचा यामध्ये समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोड व पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन केली आहे. याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी असून सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा), सावंतवाडी हे आहेत. या समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी व दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली व दोडामार्ग तसेच पोलीस निरीक्षक सावंतवाडी व दोडामार्ग यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
टास्क फोर्सच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रात संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा, पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा, प्रचार-प्रसिद्धीचा तसेच प्राप्त तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही गावात खाजगी मालकीच्या अथवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे किंवा वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील, वनरक्षक किंवा तलाठी यांच्यापैकी कोणालाही माहिती द्यावी, असे आवाहन सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या वतीने केले आहे.
चौकट
हेल्पलाईन जारी
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. या ई-मेलवर वृक्षतोडीच्या घटनांबाबत नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तसेच ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावरही वृक्षतोडीबाबत तक्रार नोंदविता येईल.