-rat२०p१.jpg-
26O58424
रत्नागिरी ः शहरातील मांडवी समुद्रकिनारी कळपाने विसाव्याला आलेली मोकाट गुरे.
-----
अखेर मोकाट गुरांची धरपकड सुरू
चंपक मैदानातील निवाराशेडमध्ये ३४ गुरांची रवानगी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : प्रचंड उपद्रव माजवलेल्या शहरातील मोकाट गुरांविरुद्ध अखेर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी ३४ गुरांना पकडून चंपक मैदानातील निवाराशेडमध्ये ठेवण्यात आले आहे. भविष्यात ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यामुळे शहरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील विविध रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा प्रचंड वावर वाढला होता. रस्त्याच्या मध्यभागी गुरे बसत असल्याने आणि अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत होत्या. काही अपघातदेखील झाले आहेत. गुरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक आणि वाहनधारक हैराण होते. सोशल मीडियावरदेखील याबाबत अनेकांनी पालिकेचे वाभाडे काढले होते. गुरांच्या समस्येवर कारवाई करण्याची मागणी होत होती. अखेर पालिकेने मोकाट गुरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मोकाट गुरे पकडण्यासाठी पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबवून मोकाट गुरे ताब्यात घेतली जात आहेत. मंगळवारी दिवसभरात ३४ गुरे पकडण्यात आली. पकडण्यात आलेली सर्व गुरे चंपक मैदान येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत.
या मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांवरील मोकाट गुरांचा त्रास कमी होऊन नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे; मात्र, पकडण्यात आलेल्या गुरांबाबत पुढील कार्यवाही काय केली जाणार आणि मोकाट गुरांविरोधातील ही मोहीम सातत्याने सुरू राहणार का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या परिसरात मोकाट गुरांमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी नगर पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे.