बनावट खत-औषध विक्रीला लगाम
कृषी विभागाचे गुणनियंत्रक पथक जिल्हाभर सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत तसेच बनावट खते व औषधांच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्हास्तरावरील गुणनियंत्रक पथकामार्फत जिल्हाभरातील खतविक्री केंद्रे आणि औषध दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत खते किंवा औषधांची चुकीच्या पद्धतीने विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेश नाटेकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक बुधवारी (ता. १९) सभापती महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे, जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील कृषी विभागाच्या एकूण कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात आवश्यक ती खते आणि औषधे वेळेत तसेच योग्य दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. खतविक्री केंद्रे तसेच औषध दुकानांना गुणनियंत्रक पथकाकडून भेटी देऊन तेथील खते व औषधांची तपासणी केली जाणार आहे. त्यांची गुणवत्ता, विक्रीची पद्धत आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी माहिती याची पडताळणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान बनावट किंवा निकृष्ट दर्जाची खते, औषधे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळल्यास अथवा नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांच्या पिकांचे नुकसान टळावे, यासाठी गुणनियंत्रणाच्या कामाला अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्याचे नाटेकर यांनी सांगितले.
---
खताचा पुरेसा साठा उपलब्ध
जिल्ह्यात खताचा पुरेसा साठा असून शेती हंगामात कोणत्याही तालुक्यात खताची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. खताबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच खत आणि औषधांच्या मागणीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला, असे नाटेकर यांनी सांगितले.