58950
58951
मोटार-एसटी धडकेत तिघे गंभीर
केळवली फाट्याजवळ घटना; जखमी शिरगावचे रहिवासी
सकाळ वृत्तसेवा
देवगड/राजापूर, ता. २२ : केळवली फाटा, जामदे पुलाजवळ (ता. राजापूर) येथे एसटी बस आणि मोटार यांच्यात जोरदार धडक झाली. ही दुर्घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. यामध्ये एसटी चालकाने मोटारीला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. मोटार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये शिरगाव येथील तिघेजण गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी मोटारचालक अमित रमेश साटम (शिरगाव, देवगड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी चालकाविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये युधिराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५) आणि राज रामदास म्हाळवदे (वय २२, सर्व शिरगाव, ता. देवगड) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साटम हे मोटारीने (एमएच ०७, बीजी ९०९७) शिरगाव येथून आपल्या मित्रांसह प्रवास करत होते. ते केळवली-पाचलमार्गे अणुस्कुराच्या दिशेने पुण्याकडे जात होते. वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा रिंगेवाडी खारेपाटण (एमएच २० बीएल ३०७९) ही बस चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांच्या ताब्यात होती. या बसवर वाहक दशरथ गोविंद जाधव होते. एसटी बस केळवली फाट्यावरील जामदे पुलाच्या जवळ आली असताना वळणावर समोरून येणाऱ्या मोटारीला जोरदार धडक दिली. यामुळे मोटार बसबरोबर फरफटत गेली. यात मोटारीतील तीन जण जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, हेडकाँस्टेबल रहिम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. राजापूर आगारप्रमुख काव्या पेडणेकर, वाहतूक नियंत्रक अजय सिडाम आदींसह सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड यांनी तत्काळ अपघातस्थळी भेट दिली. यात बसचे सुमारे चाळीस हजार, तर मोटारीचे सुमारे साठ हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.