कोकण

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ‘अवघा सिंधुदुर्ग’

CD

59065
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे वैविध्य दाखविणारे दालनातील कॅनव्हास पेंटिंग.
59066
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून नूतनीकरण केलेले प्रशासकीय दालन.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ‘अवघा सिंधुदुर्ग’
धोडमिसे यांची संकल्पना; समुद्रकिनारा, किल्ले, रेल्वे, विमानसेवेसह कोकणी संस्कृतीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ : दालनात प्रवेश करताच एका नजरेत सिंधुदुर्गचा समुद्रकिनारा, किल्ले, रेल्वे, विमानसेवा, हिरवाई, वन्यजीव, कोकणी संस्कृती आणि प्रत्येक तालुक्याची वेगळी ओळख अनुभवायला मिळावी, अशा कल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला आता आगळेवेगळे रूप मिळाले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच झालेल्या नूतनीकरणात प्रशासकीय दालनाची चौकट मोडत ‘अवघा सिंधुदुर्ग’च या दालनात उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नूतनीकरण केलेल्या या दालनाचे उद्‍घाटन १५ ऑगस्टला पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दालनातील सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैविध्य दाखविणारे भव्य कॅनव्हास पेंटिंग. वैभववाडीच्या डोंगररांगा आणि धबधब्यांपासून कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि सिंधुदुर्गनगरीपर्यंत जिल्ह्याची वैशिष्ट्ये एका कलाकृतीत गुंफण्यात आली आहेत. समुद्र, मासेमारी, दीपगृह, रेल्वे, मंदिर संस्कृती, कोकणी खाद्यसंस्कृती, वनसंपदा, वन्यजीव, शेती अशा सिंधुदुर्गच्या विविध ओळखी चित्रांतून अधोरेखित होतात. या पेंटिंगमध्ये मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्ष वेधून घेते. सिंधुदुर्गच्या इतिहासाशी असलेले शिवकालीन नाते आणि जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख आधुनिक वाहतूक व पर्यटनाच्या प्रतिकांसोबत जोडण्यात आली आहे.
मुख्य कॅनव्हाससोबतच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे आणि ठिकाणांचे स्वतंत्र फोटोही दालनात आहेत. विजयदुर्ग जेटी, चिपी विमानतळ, कुडाळ रेल्वेस्थानक, मळगाव, सावंतवाडी येथून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग यांना स्वतंत्रपणे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेबरोबरच दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधील बदलही दालनात पाहायला मिळतात. जिल्हाधिकारी आसनाच्या पाठीमागील भिंतीवर किल्ल्याची प्रतिमा विशेष थ्री-डी आर्ट स्वरूपात साकारण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाची छाप दालनाच्या मुख्य भागावर उमटते.
-------
कोकणीपण जपणारी सजावट
दालनाचे नूतनीकरण करताना केवळ आधुनिक फर्निचरवर भर न देता स्थानिकतेचा स्पर्श कायम ठेवण्यात आला आहे. मातीची पारंपरिक भांडी, शोभेची झाडे आणि हिरवाईसदृश सजावटीतून दालनाला नैसर्गिक लूक देण्यात आला आहे. दालनात गणपतीची सुबक प्रतिष्ठापनाही करण्यात आली असून, त्यामुळे आधुनिक रचनेला पारंपरिक संस्कृतीची जोड मिळाली आहे. कुठे जिल्ह्याची ओळख सांगणारी कलाकृती, कुठे ऐतिहासिक संदर्भ, तर कुठे पर्यटन आणि विकास प्रकल्पांचे छायाचित्र अशा पद्धतीने दालनातील जागा सजविली आहे.
--------
प्रशासकीय दालनातून जिल्ह्याची ओळख
सामान्यतः जिल्हाधिकारी दालन म्हटले की, प्रशासकीय बैठक, फायली आणि औपचारिक वातावरण असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, सिंधुदुर्गच्या नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनात प्रशासनासोबतच जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्याचा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. बाहेरून येणारा अधिकारी, मंत्री, उद्योजक अथवा पाहुणा काही क्षण दालनात थांबला तरी त्याला सिंधुदुर्गचा इतिहास, निसर्ग, पर्यटन, संस्कृती आणि विकासाची दिशा समजावी, हा या संकल्पनेमागील मुख्य हेतू आहे.
-----
एका चित्रात नऊ रंगांचा ‘सिंधुदुर्ग’
भव्य कॅनव्हासवर वैभववाडीची डोंगररांग, कणकवलीची ओळख, मालवणचा समुद्र व खाद्यसंस्कृती, देवगडचा किनारा, वेंगुर्ल्याचे दीपगृह, कुडाळची सांस्कृतिक ओळख, सावंतवाडीची कला, दोडामार्गची वनसंपदा आणि सिंधुदुर्गनगरीचे प्रशासकीय महत्त्व अशा विविध पैलूंचा कलात्मक मेळ घालण्यात आला आहे. रेल्वे, मासेमारी, शेती, वन्यजीव आणि समुद्री जीवन यांचाही त्यात समावेश असल्याने हे पेंटिंग दालनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT