-rat२४p१०.jpg-
26O59315
सावर्डे : येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचा रस्ता असा खचला आहे.
-rat२४p८.jpg-
26O59312
सावर्डे ः धोकादायक ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.
----
सावर्डेत महामार्ग पुन्हा खचला
गणेशोत्सवाच्या तोंडावर विघ्न; खड्ड्यात दोन वाहनांचे टायर अडकले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांचे विघ्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे रविवारी रात्री महामार्गाचा रस्ता पुन्हा खचून मोठा खड्डा पडल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या खड्ड्यात दोन चारचाकी वाहनांचे टायर अडकल्याने किरकोळ अपघात झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सावर्डे येथील आरती स्वीट्ससमोर यापूर्वी महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात वाहने आदळून अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या होत्या. महामार्गावरील या धोकादायक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. समस्या तातडीने सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला होता.
यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या समस्येची दखल घेत संबंधित ठिकाणी दुहेरी वाहतूक बंद करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. खड्डा बुजवून महामार्गाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, दुरुस्तीचे काम झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच पुन्हा महामार्गाचा भाग खचल्याने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रविवारी रात्री महामार्गाच्या एका भागात अचानक मोठा खड्डा पडला. रात्रीच्या अंधारात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने दोन चारचाकी वाहनांचे टायर त्यात अडकले. त्यामुळे अपघात झाला. सुदैवाने, वाहनांमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही; मात्र, या घटनेमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाने तातडीने दखल घेत या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे काही काळ वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत सावर्डेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पुन्हा रस्ता खचल्याने गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचे सांगितले जात असतानाच वारंवार रस्ता खचणे, खड्डे पडणे आणि केलेली दुरुस्ती पुन्हा उखडणे यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गणेशोत्सवापूर्वी सावर्डे येथील रस्ता मजबूत पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी तसेच भविष्यात याच ठिकाणी पुन्हा रस्ता खचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
---
दुरूस्तीवर दुरुस्ती कशासाठी?
महामार्गावर यापूर्वी निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली असतानाच त्याच परिसरात पुन्हा रस्ता खचल्याने दुरुस्तीवर दुरूस्ती’ करण्याची वेळ का येत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लाखो प्रवासी या मार्गावरून कोकणात ये-जा करणार असल्याने महामार्ग विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाय करावा.
-नीलेश खापरे, सामाजिक कार्यकर्ते, असुर्डे
---
कोट
सावर्डे येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथील वाहतूक बंद केली आहे. रस्ता दुरुस्तीच्या सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.
-श्याम खुणेकर, साहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
-------------
कोट
हा महामार्ग हा ब्रिटिशकालीन पुलावरच बांधल्याने येथे पाणी साचून वारंवार खड्डे पडून अपघात होत आहेत. ब्रिटिशकालीन पुलाची पूर्ण खालून पाहणी करून मग महामार्ग तयार करावा अन्यथा मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला तोंड द्यावे लागेल.
---देवराज गरगटे, सामाजिक कार्यकर्ते, सावर्डे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.