rat25p17.jpg
59561
रत्नागिरी : उक्षी गावात मोबाईल रेंज गायब झाल्याने कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
-----------
मोबाईल रेंजअभावी
उक्षी गाव संपर्कक्षेत्राबाहेर
गावकऱ्यांचे कंपनी कार्यालयावर धडक
रत्नागिरी, ता. २४ : तालुक्यातील उक्षी गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल नेटवर्क गायब झाल्याने ग्रामस्थांनी कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली व जाब विचारला. उक्षी आणि बनाचीवाडी ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या; मात्र कंपनी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नेटवर्कअभावी दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ऑनलाईन शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरवातीच्या काळात गावात संबंधित कंपनीचे नेटवर्क उत्तम दर्जाचे मिळत असल्याने अनेक ग्रामस्थांनी घरात दोन ते तीन सिमकार्ड खरेदी केली होती; मात्र, गेल्या दोन वर्षांपासून उक्षी गाव आणि बनाचीवाडी परिसरामध्ये नेटवर्क गायब झाले आहे. फोन लावण्यासाठी अथवा इंटरनेट वापरण्यासाठी नागरिकांना उंच टेकड्यांवर जावे लागत आहे. दरमहा ३०० ते ४०० रुपयांचे रिचार्ज मारूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांचे पैसे वाया जात आहेत.
या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. महिन्याभरापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन सर्व्हे केला असता नेटवर्क नसल्याची वस्तुस्थिती समोर आली होती. तरीही समस्येवर तोडगा न काढता आता ग्रामपंचायतीच्या पत्राची कारणे पुढे करून टाळाटाळ केली जात असल्याचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी सांगितले.
सिमकार्ड विकताना कोणतीही मंजुरी न मागणारी कंपनी आता सेवा देताना अडवणूक करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी तातडीने नेटवर्क टॉवर किंवा बूस्टर बसवून सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.