59744
मोकाट जनावरांना रेडियम पट्टे
कुडाळात मोहीम; अपघात रोखण्यासाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः रात्रीच्या अंधारात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ संकल्पनेअंतर्गत १४ जनावरांना रेडियमचे रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता. २५) रात्री ही मोहीम हाती घेण्यात आली.
रात्रीच्या वेळी रस्त्यावरील जनावरे वाहनचालकांना वेळेत दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन जनावरांच्या गळ्यात रेडियमचे रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. वाहनांच्या प्रकाशझोतात हे पट्टे दूरवरून चमकत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील जनावरे वेळीच दिसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास हातभार लागणार आहे.
‘‘एक छोटासा प्रयत्न, अनेक जीवांचे संरक्षण’ या भावनेतून हा उपक्रम सुरू केला असून, यामुळे मुक्या प्राण्यांसह वाहनचालकांचेही प्राण वाचण्यास मदत होईल,’’ असे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सांगितले. या उपक्रमाचे नागरिक व वाहनचालकांकडून कौतुक करण्यात आले. या मोहिमेत नगरसेवक संतोष शिरसाट, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, सतीश कुडाळकर, केदार काळप, भूषण कुडाळकर, संदीप म्हाडेश्वर, यश मोहिते, दीपक भोगटे, अमित राणे, मंदार चंद्रकांत शिरसाट, रोहन काणेकर, शैलेश काळाप, दिनार शिरसाठ आदी सहभागी झाले.
----
वाहनधारकांनी घ्यावी काळजी
रात्रीच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा. रस्त्यावर मोकाट जनावरे दिसल्यास तत्काळ वेग कमी करून सुरक्षित अंतर राखावे. जनावरांच्या जवळून जाताना अचानक हॉर्न वाजवू नये. अंधारात हेडलाइटचा योग्य वापर करावा. पावसाळ्यात रस्ता निसरडा असल्याने अधिक सावधगिरी बाळगावी. जनावरे अचानक रस्ता ओलांडू शकतात, हे लक्षात घेऊन वाहन चालवावे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.