‘शूर्पारक–सोपारा’ पुस्तक नव्हे तर संदर्भ ग्रंथ!
डॉ. भीमराव आंबेडकर ः नालासोपाऱ्याचा २६०० वर्षांचा इतिहास
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ : नालासोपारा शहराचा सुमारे २६०० वर्षांचा बौद्धकालीन इतिहास, प्राचीन स्तूप, पुरातत्त्वीय स्थळे आणि उत्खननातून मिळालेल्या ऐतिहासिक अवशेषांची माहिती एका ठिकाणी संकलित करणारा ‘शूर्पारक–सोपारा : भारतातील प्राचीन बौद्धनगरी’ हा ग्रंथ केवळ पुस्तक नसून महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे, असे गौरवोद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी काढले.
खेड तालुक्यातील रसाळगड येथील लेखक व ॲड. डॉ. संतोष सखूबाई देवजी सावंत यांच्या संशोधन, लेखन आणि संकलनातून साकारलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे लेखकाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातच ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सोपारा येथील प्राचीन बौद्ध स्तुपाच्या १८८२ आणि १८९८ मधील उत्खननांतून प्राप्त झालेल्या अवशेषांचे महत्त्व डॉ. आंबेडकर यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचे १३ तुकडे, कास्यधातूच्या आठ मूर्ती, सोनेरी पत्र्यावरील बुद्धमूर्तीची छाप, काचेचे मणी, सोन्याची फुले तसेच तांबे, चांदी, वालुकाश्म, स्फटिक आणि सोनेरी करंडकसारख्या महत्त्वपूर्ण वस्तूंची माहिती ग्रंथात समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नालासोपारा येथील महाशिलालेख क्र. ८ व ९ तसेच मौर्यकालीन दगडी पेटी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात लेखकासोबत पाहिल्याचेही डॉ.आंबेडकर यांनी नमूद केले. तसेच दी एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे सोपारा स्तुपाशी संबंधित अवशेषांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे. तसेच बौद्धस्थळे, स्तूप, पुरातत्त्वीय अवशेष आणि ऐतिहासिक खुणांच्या संवर्धनासाठी भारतीय बौद्ध महासभेची टीम पुरातत्त्व विभागाच्या संपर्कात राहून प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.