कोकण

पैसा बोलतो आपण ऐकतो

CD

पैसा बोलतो,आपण ऐकतो?.................लोगो
(२१ ऑगस्ट टुडे ३)

पैशाबद्दलच्या आपल्या समजुती
कुठून तयार होतात?

पैशाबद्दलचे आपले निर्णय फक्त उत्पन्न, शिक्षण किंवा गणित यावर ठरत नाहीत. अनेकदा त्यामागे नकळत तयार झालेल्या समजुती काम करत असतात. पैसा म्हणजे सुरक्षितता की ताण? श्रीमंती म्हणजे यश की लोभ? खर्च म्हणजे आनंद की अपराधीपणा? या प्रश्नांची उत्तरं आपण मोठे झाल्यावर तयार होत नाहीत; त्यांची बीजं अनेकदा बालपणातच रोवली गेलेली असतात. म्हणूनच दोन व्यक्तींचं उत्पन्न सारखं असलं तरी पैशाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी पूर्णपणे वेगळी असू शकते. या फरकामागे फक्त आर्थिक स्थिती नसते; तर अनेक वर्षांत तयार झालेली मानसिक चौकट असते....!
- rat२७p७.jpg-
26O59951
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
---
‘पैसे झाडावर लागत नाहीत’, ‘खर्च कमी करा’, ‘कधी काय होईल सांगता येत नाही.’ अशी वाक्यं वारंवार ऐकू येतात. अशा वातावरणात वाढलेल्या व्यक्तींना मोठे झाल्यावरही खर्च करताना असुरक्षितता वाटू शकते. उलट काही घरांमध्ये पैसा हा प्रतिष्ठा आणि दिखाव्याशी जोडला जातो. ‘लोकांमध्ये कमीपणा येता कामा नये’ ही भावना आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकते. विशेष म्हणजे या समजुती फक्त शब्दांतून तयार होत नाहीत; त्या वर्तनातूनही तयार होतात. मुलं अनेकदा ‘पैशाबद्दल काय सांगितलं जातं’ यापेक्षा ‘पैशाबद्दल काय केलं जातं’ हे जास्त शिकत असतात. घरात सतत आर्थिक तणाव किंवा कर्जामुळे वाद होत असतील, तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीच्या आर्थिक मानसिकतेवरही होऊ शकतो. काही घरांमध्ये पैशाबद्दल सतत चिंता व्यक्त केली जाते. घरातील वातावरण ही पहिली चौकट आहे.
काही लोक मोठे झाल्यावर प्रत्येक खर्च टाळण्याकडे झुकतात. पैसे खर्च झाले की अस्वस्थ वाटतं. त्यांना आर्थिक सुरक्षितता असूनही सतत कमतरतेची भावना जाणवत राहते. दुसरीकडे काही लोक ‘आज आहे, उद्या कोणी पाहिलंय’ या मानसिकतेतून सतत खर्च करत राहतात. बचत, विमा किंवा दीर्घकालीन नियोजन यांना ते पुढे ढकलतात. दोन्ही टोकांच्या मागे अनेकदा भावनिक अनुभव काम करत असतात. त्यामुळे आर्थिक सवयी समजून घेताना फक्त आकडे पाहून उपयोग होत नाही; त्यामागची मानसिकता समजून घ्यावी लागते. यात समाजाचाही प्रभाव मोठा असतो. ‘शासकीय नोकरी म्हणजे सुरक्षितता’, ‘घर म्हणजेच सर्वात मोठी गुंतवणूक’, ‘शेअर बाजार म्हणजे जुगार’, ‘कर्ज घेतलं म्हणजे सर्वनाश’ अशा अनेक समजुती पिढ्यानपिढ्या पुढे जात असतात. विशेषतः मध्यमवर्गीय समाजात एक विरोधाभास दिसतो; आर्थिक सुरक्षितताही हवी असते आणि सामाजिक प्रतिमाही टिकवायची असते. अनेक आर्थिक संघर्ष या दोन गोष्टींमधील ताणातून निर्माण होतात.
भारतीय समाजमनावर चित्रपट आणि माध्यमांचाही मोठा प्रभाव राहिलेला आहे. जुन्या काळातील अनेक चित्रपटांमध्ये ‘हट्टीकट्टी गरिबी आणि ‘लुळीपांगळी श्रीमंती’ असं चित्रण वारंवार दिसत असे. प्रामाणिक गरीब नायक आणि कपटाने पैसा कमावणारा श्रीमंत खलनायक ही रचना इतकी सतत दाखवण्यात आली, की पैसा आणि नैतिकता यांच्यात संघर्ष आहे अशी समज अनेकांच्या मनात रुजली. परिणामी ‘खूप पैसा म्हणजे काहीतरी चुकीचं असणार’ किंवा ‘श्रीमंत लोक गैरव्यवहार करूनच मोठे होतात’ अशा समजुती समाजमनात खोलवर रुजल्या.
याचा अर्थ या समजुती पूर्णपणे चुकीच्या असतात असं नाही. काटकसरीची सवय, बचतीचं महत्त्व, कर्जाबाबत सावध दृष्टी या गोष्टी अनेकदा उपयोगीही ठरतात. प्रश्न त्या समजुती आजच्या वास्तवाशी जुळतात का याचा आहे. कारण आर्थिक जग सतत बदलत असतं. आपल्या आई-वडिलांच्या काळात जे योग्य होतं ते आज तितकंच योग्य असेलच असं नाही. पूर्वी स्थिर नोकरीला महत्त्व होतं; आज कौशल्य आणि आकलन क्षमता अधिक महत्त्वाची होत आहेत. त्यामुळे आर्थिक विचारांमध्येही बदल आवश्यक असतो.
म्हणूनच आर्थिक साक्षरतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःच्या पैशाबद्दलच्या समजुती ओळखणं. ‘मी पैशाकडे असं का पाहतो?’ हा प्रश्न अनेकदा आर्थिक निर्णयांपेक्षा मोठा ठरतो. कारण अनेकदा आपण पैसा नव्हे, तर जुन्या अनुभवांना आणि नकळत तयार झालेल्या मानसिक चौकटींना हाताळत असतो. आर्थिक स्थैर्य हे फक्त उत्पन्न वाढल्याने निर्माण होत नाही; ते पैशाबद्दलच्या विचारांमध्ये स्पष्टता आल्यावर निर्माण होतं. पुढील लेखात आपण तुलना, सामाजिक अपेक्षा आणि ‘लोक काय म्हणतील?’ या मानसिकतेचा आर्थिक निर्णयांवर होणारा परिणाम पाहू.

(लेखक सीए असून रत्नागिरीत प्रॅक्टीस करत आहेत)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, मुंबईत १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

Ratnagiri Jan Suvidha: ‘जन’सह ‘नागरी’ सुविधांचा वेग वाढला निविदा-वर्कऑर्डर प्रक्रियेला गती; हजारावर कामे पूर्ण

SCROLL FOR NEXT