रेशनिंगच्या लाभार्थ्यांची पडताळणी
‘मिशन सुधार’ अभियान; दुबार, जादा उत्पन्नधारकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः शासनाच्या रेशनिंग धान्य योजनेचा लाभ पात्र गरजवंतांनाच मिळावा आणि अपात्र लाभार्थ्यांचा गैरवापर रोखावा, यासाठी तालुक्यात ‘मिशन सुधार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील १ हजार ७१० लाभार्थी अपात्रांच्या यादीत असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
या यादीमध्ये दुबार लाभार्थी, जादा उत्पन्न असलेले, संस्था संचालक तसेच गेल्या चार-पाच महिन्यांपासून रेशनिंग धान्याची उचल न करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व लाभार्थ्यांची गावोगावच्या रास्त धान्य दुकानांमार्फत पडताळणी सुरू आहे. पडताळणीनंतर अपात्र आढळणाऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहेत.
तालुक्यात अंत्योदय योजनेचे ४ हजार २३४ तर प्राधान्य योजनेचे २६ हजार २३८ लाभार्थी असून, एकूण ३० हजारांहून अधिक रेशनिंग कार्डधारक आहेत. त्यामुळे पडताळणीअंती १ हजार ७१० जणांपैकी प्रत्यक्षात किती लाभार्थी अपात्र ठरतात, याकडे लक्ष लागले आहे.
---
अपात्र ठरणारे राजापुरातील लाभार्थी
* दुबार नोंदणी लाभार्थी ः २८७
* उत्पन्न वाढलेले लाभार्थी ः ४७८
* सलग सहा महिने रेशन न उचलणे ः ८५७
* संस्था संचालक ः ८८
---
काटेकोरपणे पडताळणी होणार का?
गावोगावच्या रेशनिंग धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मिशन सुधार अभियानांतर्गत अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अनेक रेशनिंग धान्य दुकानदार हे त्या त्या गावातील असल्याने त्याचे लाभार्थ्यांशी स्थानिक ग्रामस्थ म्हणून नातेसंबंध असतात. त्याचवेळी मोठ्या संख्येने पात्र लाभार्थी कमी झाल्यास त्याचा त्या रास्त धान्य दुकानदाराला कमिशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होऊन हे कमिशन घटणार आहे. त्यामुळे अपात्रतेच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या आपल्याच गावातील लाभार्थ्यांची त्याच्या विरोधात जाऊन रास्त धान्य दुकानदार पारदर्शकतेने खरी पडताळणी करतील का? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.