सोनवडे फाटा ते वाशी रस्त्याची दुरवस्था
आश्वासनानंतरही काम ठप्प; अपघाताचे वाढले धोके
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ : तालुक्यातील सोनवडे फाटा ते वाशी या रस्त्याच्या अत्यंत बिकट अवस्थेबाबत गेल्या दोन महिन्यांत देवरूखच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दोनवेळा पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र, अद्यापही या रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोनवडे फाटा ते वाशी या रस्त्याविषयी मुचरी युवा सामाजिक संस्थेने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित अभियंत्यांनी या संस्थेला पत्र देऊन रस्त्यावर आलेली झाडे तसेच दगड दूर करण्याचे काम प्रगतिपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. या पत्राला आता १५ दिवस उलटूनही कंत्राटदार कोंडवाडी प्रकल्प धरणग्रस्त मजूर सहकारी संस्था यांच्याकडून प्रत्यक्ष कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. रस्त्याची अवस्था आजही पूर्वीप्रमाणेच असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठा अपघात किंवा मनुष्यहानी झाल्यानंतरच संबंधित प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? तसेच संबंधित कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई होत असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासनाची राहील, असा इशारा मुचरी युवा सामाजिक संस्थेने दिला आहे.
---
केवळ आश्वासन नको
प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी आणि रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी मुचरी युवा सामाजिक संस्थेसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.