महामार्ग ते उद्योग; ठाकरे गटाची खेळी!
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी, कोकणातील वाहतुकीचे प्रश्न आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी बंद दाराआड झालेली चर्चा, या घटनांकडे केवळ राजकीय दौरा म्हणून पाहण्यापेक्षा ठाकरे गटाच्या कोकणातील नव्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. रस्ते, वाहतूक आणि उद्योग या तीन प्रमुख मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याचे या दौऱ्यातून पुढे आले आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर येतो. यंदाही महामार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना होणारा त्रास या मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. तसेच गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढतो. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन कितपत सक्षम ठरते आणि रखडलेल्या कामांचा प्रवाशांना किती त्रास होतो, यावर सरकारची प्रतिमा अवलंबून राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामुळे हा दौरा केवळ पाहणीपुरता मर्यादित न राहता आगामी काळातील राजकीय मुद्द्यांची पायाभरणी करणारा ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात महामार्गाबरोबरच लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेष म्हणजे उद्योजकांशी बंद दाराआड चर्चा करण्यात आली. या चर्चेचे राजकीय महत्त्व अधिक आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री आहेत. लोटेतील उद्योगविश्वाशी संबंधित प्रश्न थेट उद्योग विभागाशी जोडले जातात. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या किंवा सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असलेल्या उद्योजकांनी सार्वजनिक व्यासपिठावर सरकारविरोधात भूमिका मांडणे सहज शक्य नसते. ही राजकीय वस्तुस्थिती लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी उद्योजकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीच्यादृष्टीने महामार्ग हा केवळ प्रवासाचा प्रश्न नाही. उद्योगांसाठी कच्चा माल, तयार उत्पादनांची वाहतूक, कामगारांची ये-जा आणि बाजारपेठेशी संपर्क यासाठी महामार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे महामार्गाची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडीचा थेट परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होतो. याच कारणामुळे रस्त्याचा आणि उद्योगांचा प्रश्न एकत्र मांडण्याची राजकीय संधी ठाकरे गटाला मिळाली आहे.
---
आक्रमक भूमिकेचे संकेत
सुभाष देसाई यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांचा महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्राचा दौरा झाल्याने ठाकरे गटाने जिल्ह्यात संघटनात्मक तयारीसोबतच स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कोकणात पारंपरिक भावनिक राजकारणाबरोबरच आता रोजगार, उद्योग, महामार्ग, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे प्रश्नही महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे या मुद्द्यांना हात घालून ठाकरे गट आपली राजकीय जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात रत्नागिरीतील राजकारणात महामार्ग आणि उद्योग हे दोन मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.