‘एफडीए’ची विशेष तपासणी मोहीम
सणासुदीसह शाळा-अंगणवाड्यांतील अन्नावरही लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : गणेशोत्सवासह आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) राज्यभरात विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. सणापूर्वी, सणादरम्यान आणि सणानंतर अशा तीन टप्प्यांमध्ये ही अन्नसुरक्षा तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाकडून उद्यापासून धडक तपासणी मोहीम सुरू होणार आहे.
मुंबई प्रेस क्लबच्यावतीने आयोजित ‘मीट दी प्रेस’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रशासनाच्या या धडक नियोजनाची घोषणा केली. सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क करण्यात येत आहे. केवळ वैध परवानाधारकांनीच अन्नपदार्थ तयार करून त्यांचा पुरवठा करावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत अन्नपदार्थांचे नमुने घेण्यास सुरुवात झाली असून, दर महिन्याला ठराविक नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. या मोहिमेअंतर्गत आता शाळांमधील मध्यान्ह भोजन, अंगणवाड्या तसेच शाळा व अंगणवाड्यांना अन्नपुरवठा करणाऱ्या ‘सेंट्रल किचन’लाही अन्नसुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. तेथे पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी वर्षातून किमान दोनवेळा प्रत्यक्ष तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्यांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्न महाप्रसादाचे असो वा भंडाऱ्याचे, अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक अन्न व्यावसायिकाकडे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी असणे आणि निर्धारित मानकांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.