संशोधन परिषद पूर्वतयारी कार्यशाळेत
जिल्ह्यातील ६० प्राध्यापकांचा सहभाग
दापोली : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला योग्य दिशा देत समाजोपयोगी संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ‘आविष्कार २०२६-२७’ आंतरमहाविद्यालयीन संशोधन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत २३ महाविद्यालयांमधील ६० प्राध्यापक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित करणे, संशोधन विषयाची व्याप्ती, उपयुक्तता तसेच दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करणे, हा होता. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दापोली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमकर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. घनश्याम साठे यांनी प्रास्ताविकातून ‘आविष्कार’ स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी याबाबत माहिती दिली. तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. शशिकांत मेनन, डॉ. सुनीता शैलजन आणि डॉ. मीनाक्षी गुरव यांनी संशोधन प्रकल्प निवड, संशोधनाची दिशा, प्रकल्पाची मांडणीवर मार्गदर्शन केले.
देवरुखात मंगळवारी प्रो गोविंदा चषक स्पर्धा
देवरूख : शहरातील खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त गोकुळाष्टमीचे औचित्य साधून १ सप्टेंबरला श्री महापुरुष प्रो गोविंदा चषक दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. महापुरुष मंदिरासमोर गोविंदा पथकांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये, उपविजयी संघाला १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. सहभागी सर्व संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, नावनोंदणी करावी.
वक्तृत्व स्पर्धेत रुंजी गोखले, आस्था गुरव प्रथम
देवरूख : सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर येथे झालेल्या ‘अंतरिक्षावर बोलू काही’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील लहान गटात जिल्हा परिषद शाळा देवरूख क्र. ४ ची रुंजी गोखले हिने प्रथम, बने इंटरनॅशनल स्कूलच्या निहारिका यादव हिने द्वितीय तर याच शाळेची सान्वी भिंगार्डे हिने तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय येथील आस्था गुरव हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर जिल्हा परिषद केंद्रशाळा, पाटगाव येथील आर्या पंदेरे हिने द्वितीय आणि पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलच्या आयुष चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना पदक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.