रत्नागिरीत १५ सप्टेंबरला मुलाखती
रत्नागिरी ः भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड (नाशिक) येथे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार असून, यामध्ये निवडक उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून मुलाखतीवेळी सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळवले आहे.
संगमेश्वर आयटीआयमध्ये
सोलर टेक्निशियन पदासाठी भरती
रत्नागिरी ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वर, येथे पीपीपीअंतर्गत असलेल्या आयएमसीमार्फत नवीन सुरू होणाऱ्या सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या व्यवसायासाठी कंत्राटी निदेशक पदाची एक जागा ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. डीजीटीच्या मानकानुसार पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र शाखेतील विद्युत अभियांत्रिकी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आणि विद्युत क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील किमान द्वितीय श्रेणीतील पदविका आणि विद्युत क्षेत्रातील किमान २ वर्षाचा अनुभव किंवा सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र परीक्षा व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच विद्युत क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपले अर्ज ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, रामपेठ सप्तेश्वर रोड (ता. संगमेश्वर) या पत्त्यावर प्रत्यक्ष हस्तदेय स्वरूपात सादर करायचे आहेत. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार उमेदवारांची मुलाखत व व्यावसायिक चाचणी घेऊन निवड केली जाणार आहे. हे पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून, रोजगाराची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव आयएमसी ऑफ आयटीआय संगमेश्वर यांनी केले आहे.
जि. प. काम वाटप समितीची गुरुवारी सभा
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठीच्या काम वाटप समितीची सभा ३ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. ही सभा जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) यांच्यासाठी रुपये १० लाखांच्या मर्यादेतील कामांचे वाटप करण्यात येणार आहे. संबंधित संस्था व अभियंत्यांनी या सभेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन काम वाटप समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.