राज्य नाट्यस्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेशिका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या १६ नोव्हेंबरपासून हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्यस्पर्धेसह बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा होणार आहेत. नाट्यसंस्थांनी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.
२३व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून विविध १० केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तसेच ६५व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक केंद्रावर डिसेंबर २०२६ पासून आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेस संस्थेने प्रयोग सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या संस्थेने निश्चित तारखेला प्रयोग सादर केला नाही तर प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. तसेच नाट्यस्पर्धेतील संस्थांना शासनाचे नियम बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेवर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल.
------
हे आहे संकेतस्थळ
नाट्यस्पर्धेसाठी नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्था तसेच गतवर्षीच्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका संचालनालयाच्या mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.