rat२p२४.jpg
६१२२३
राजापूर ः आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांना निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी.
एसटी सवलतीचे कार्ड नेटवर्कअभावी ठप्प
राजापुरात प्रवाशांना भूर्दंड; ठाकरे शिवसेना आक्रमक, अर्ध्याऐवजी काढावे लागले पूर्ण तिकीट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः राज्य परिवहन महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले असून, त्याची अंमलबजावणी काल (ता. १) पासून सुरू झाली; मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या आणि रिचार्जबाबत माहितीचा अभाव यामुळे सवलतधारक प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. या नाहक मनस्तापामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
‘एक देश, एक कार्ड’ या संकल्पनेनुसार हे प्रीपेड कार्ड विकसित केले आहे. युपीआय किंवा मोबाईल ॲपद्वारे रिचार्ज करून एसटी, मेट्रो आदी सेवांमध्ये सवलतीचा प्रवास करण्यासाठी हे कार्ड अनिवार्य केले आहे; मात्र, अनेक प्रवाशांना रिचार्ज प्रक्रियेची पुरेशी माहिती नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना तांत्रिक अडचणींमुळे रिचार्ज करता आले नाही. तसेच, अनेक गावांमध्ये पुरेसे इंटरनेट नेटवर्क नसल्याने धावत्या बसमध्ये कार्डद्वारे तिकीट काढताना अडचणी आल्या. काही प्रसंगांत तिकीट निघेपर्यंत प्रवाशांचा उतरण्याचा थांबा आल्याचे प्रकार घडले. त्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला.
प्रवाशांना झालेला मनस्ताप लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राजापूर एसटी आगारात धडक दिली. आगारप्रमुख काव्या पेडणेकर यांची भेट घेऊन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा दिला. या वेळी विभागप्रमुख संतोष हातणकर, उपनगराध्यक्ष विनय गुरव, पंचायत समितीचे माजी सभापती अभिजीत तेली, माजी नगरसेवक अभय मेळेकर, अनिल कुडाळी, युवासेनेचे सुहास कुपले आणि कार्यालयप्रमुख संजय पेडणेकर यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले.
चौकट १
कार्ड काढण्यासाठी एसटी आगारात रांगा
सवलतीसाठी कार्ड अनिवार्य केल्याने राजापूर एसटी आगारात कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. एजन्सीच्या कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याने आगार व्यवस्थापनाने एजन्सीधारकाच्या मदतीसाठी स्वतःचा एक कर्मचारी नियुक्त केला आहे. यामुळे कार्ड वितरणाला गती मिळाली असून, आजवर तालुक्यातील सुमारे ९ हजार जणांना कार्ड काढल्याची माहिती एसटी आगारातून देण्यात आली.
कोट १
सवलतधारक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने अनिवार्य केलेल्या एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र, त्या सोडवण्यासाठी आगार व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत ही प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईल तरी प्रवाशांनी सहकार्य करावे.
- काव्या पेडणेकर, आगार व्यवस्थापक, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.