- rat३p९.jpg-
26O61485
साखरपा ः आंबाघाटातील दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
---
आंबाघाट गणेशोत्सवापूर्वी खुला करण्याची धडपड
‘एरडॉक्स प्लेट’ने दुरुस्ती सुरू ; अवजड वाहतूक बंद, व्यापाऱ्यांना अतिरिक्त फटका
दीपक कुवळेकर ः सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३ ः रत्नागिरी–कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असून, त्या दृष्टीने ठेकेदार कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. पावसाने उघडीप दिली तरच पुढील १४ दिवसात हे काम पूर्ण होऊ शकेल. दुरुस्ती पूर्ण झाल्यास आंबाघाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णक्षमतेने खुला होणार आहे.
सध्या घाटातील अवजड वाहतूक बंद असून, एसटी बसेसही दिवसाच चालवण्यात येत आहेत. अतिमुसळधार पाऊस असेल तर या भागातून धिम्या गतीने वाहने चालवावी लागत आहेत. आंबाघाटातील गायमुखापासून दरम्यान एका धोकादायक वळणावर ३० जुलै रोजी रस्ता खचला होता. प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ अवजड वाहतूक बंद केली होती तर हलकी वाहने आणि एसटी बस सेवा सुरू ठेवली होती; मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्ता पुन्हा खचल्यामुळे एसटी सेवाही काही काळ बंद करावी लागली. यामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, आमदार किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह आंबाघाटाची पाहणी केली. त्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना करून १४ ऑगस्टपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत एसटी बस वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी चोवीस तास पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी यांची नियुक्ती केली गेली आहे.
गेले १८ दिवस याच पद्धतीने आंबाघाटातून वाहतूक सुरू आहे. सुदैवाने, पाऊस कमी असल्यामुळे गायमुखापासून काही अंतरावर खचलेला भाग जैसे थे आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुण्यातील संस्थेच्या साह्याने येथे ‘एरडॉक्स प्लेट तंत्राचा’ उपयोग करून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम गेल्या दोन दिवसात सुरू झाले आहे. पाऊस कमी असल्यामुळे या कामाला वेग आलेला आहे. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने कोकणकर आंबा घाटमार्गाचा अधिक उपयोग करतात. या कालावधीत घाटातील वाहतूक सुरळीत नसेल तर दळणवळणाची समस्या निर्माण होणार आहे, हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाला ११ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच काम हाती घेण्यात आले आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तरच दुरुस्ती पूर्ण होईल. अन्यथा आंबाघाटातील वाहतुकीवर निर्बंधच राहणार आहेत.
दरम्यान, घाटात अद्याप अवजड वाहतुकीस बंदी असल्यामुळे या मार्गावरील दैनंदिन सुमारे ९०० मालवाहू वाहनांची ये-जा पूर्णपणे ठप्प आहे. व्यापाऱ्यांना पर्यायी आणि लांबच्या मार्गाने माल आणावा लागत असून, अतिरिक्त वाहतूक खर्च सहन करावा लागत आहे. याचा थेट फटका वस्तूंच्या दरावर होत असून, नागरिक व व्यापाऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
---
काँक्रिट टाकण्याचे काम सुरू
खचलेल्या भागात काँक्रिट टाकून त्यावर भराव टाकण्यात येणार आहे. याची सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याला आवश्यक मजबुती मिळावी, यासाठी हे तंत्र अवलंबले आहे. हे काँक्रिट विशिष्ट पद्धतीने टाकण्यात येईल जेणेकरून भूगर्भातील पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल आणि रस्ता पुन्हा खचणार नाही.
---
सुरक्षेच्यादृष्टीने पोलिस यंत्रणा सतर्क
सध्या दुरुस्तीचे काम वेगात सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाकडून घाटात विशेष खबरदारी घेतली जात आहे. पावसाने साथ दिल्यास येत्या दोन आठवड्यांत दुरुस्ती पूर्ण होऊन कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---
कोट १
आंबाघाटातील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. पावसाचा कामात मोठा अडथळा निर्माण झाला नाही तर पुढील १४ ते १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच वाहतूक पूर्णपणे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
-अमित वरूटे, राष्ट्रीय महामार्ग विभाग
-
कोट २
घाटातून सध्या हलकी वाहतूक आणि एसटी बससेवा सुरू आहे. अवजड वाहनांना अद्याप बंदी आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच सुरक्षित वाहतूक राहावी यासाठी पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
- राजेंद्र यादव, पोलिस निरीक्षक, देवरूख
---
कोट ३
आंबाघाटातून सध्या सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत एसटी बस वाहतूक सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी गर्दीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार या मार्गावर जादा एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
- अश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.