rat४p२०.jpg-
६१६७७
पावस ः वानर, माकडांच्या त्रासानंतर उरलेल्या रानभाज्या पावस बाजारपेठेत विक्रीस आणल्या जात आहेत.
---------------
माकडांच्या उपद्रवाने भाज्यांचे नुकसान
राखण करत शेतकऱ्यांकडून विक्री; काकडी, चिबुडला मागणी
पावस, ता. ४ ः गणेशोत्सव जवळ आल्याने काकडी आणि चिबुडला मागणी वाढली असतानाच पावस परिसरातील शेतकऱ्यांसमोर वानर-माकडांच्या वाढत्या उपद्रवाचे संकट उभे राहिले आहे. शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने उरलेल्या उत्पादनाची राखण करून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गणेशोत्सव आणि गौरीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पावस, गावखडी, पूर्णगड, गावडे-आंबेरे परिसरातील बाजारपेठांमध्ये गावठी काकडी आणि चिबुडला मागणी वाढली आहे. गणपतीच्या नैवेद्यासाठी या भाज्यांना आवर्जून मागणी केली जाते. गावठी उत्पादन असल्याने ग्राहकांकडूनही त्यांना पसंती मिळत आहे; मात्र, वानर आणि माकडांच्या टोळ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दिवसाढवळ्या शेतात घुसून काकडी, चिबुड, केळी, नारळ तसेच भातपिकांचे नुकसान केले जात आहे. माणसे दिसल्यानंतर पळून जाण्याऐवजी माकडे अंगावर येण्याचे प्रकारही वाढल्याने शेतात राखण करणाऱ्या महिला व वृद्ध शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
माकडांच्या त्रासामुळे फळबागा आणि भाजीपाला लागवड करूनही अपेक्षित उत्पादन हातात येत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून पिंजरे लावून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वेळीच उपाय न झाल्यास गणेशोत्सवात गावठी काकडी आणि चिबुड बाजारात कमी पडण्याची शक्यता आहे.
चौकट
गावठी भाज्यांचे दर
गावठी काकडी : २५ ते ३० रुपये
चिबुड : १०० ते १३० रुपये नग
वाली : २५ रुपये जुडी
भेंडी : २५ रुपये जुडी
कोट
दिवसाढवळ्या माकडांच्या टोळ्या शेतात घुसून काकडी, चिबुड, केळी, नारळ आणि भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. माणसांना पाहताच पळून जाण्याऐवजी आता माकडे अंगावर येण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शेतात राखण करणाऱ्या महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
- संकेत राडये, शेतकरी, पावस
चौकट
वानर पकडूनही उपद्रवात दिवसेंदिवस वाढच
दरम्यान, गेली दोन वर्षे गोळप, मेर्वी, कुर्धे परिसरात वानर पकडण्याची मोहीम वनविभागाने राबवली होती. या मोहिमेत २५ ते ३० वानर पकडण्यात आले होते. अशीच मोहीम चांदेराई, पोमेंडी खुर्द, हातिस या ठिकाणीही राबवण्यात आली. तिथेही वानर पकडण्यात आले; मात्र त्यामुळे शेतकऱ्याला फारसा फायदा झालेला नाही. वानरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यापासून होणारा उपद्रवही वाढत आहे. आंबा, काजूसह पावटा, कुळीथ, कडवा, वाल, भाजीपाला पिकांचेही वानरांकडून नुकसान होत आहे. त्यामुळे वानरांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.