नवोदय विद्यालयातील
९ वी, ११ वी प्रवेश सुरू
रत्नागिरी ः पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी ९ वी आणि ११ वीमधील रिक्त जागांच्या पार्श्वभूमीवर प्रवेशपरीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत अर्ज करता येईल. ही परीक्षा १० एप्रिल २०२७ रोजी घेतली जाईल. हे विद्यालय केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत १०० टक्के अनुदानित सहशैक्षणिक निवासी विद्यालय आहे. विद्यार्थी शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शिकत असावा. विद्यार्थ्याचा फोटो व सही, पालकांची स्वाक्षरी अपार आयडी किंवा पॅन आणि आधारकार्डाची माहिती आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी ९ वी https://cbseitms.nic.in/२०२६/nvsix_९ आणि ११ वीसाठी https://cbseitms.nic.in/२०२६/nvsxi_११ या लिंकचा उपयोग करावा.
------------
कळंबस्तेत हवा
गणेश विसर्जन घाट
चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदीवर गणपती विसर्जन घाट उभारण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्री उदय सामंत चिपळूण दौऱ्यावर आले असता शौकतभाई मुकादम यांनी त्यांची भेट घेत ‘चाय पे चर्चा’तून कळंबस्ते येथील गणपती विसर्जन घाटाचा मुद्दा मांडला. यंदा घाटाचे काम होऊ शकले नसले तरी पुढील वर्षी तरी घाट उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर मंत्री सामंत यांनी पुढील वर्षी कळंबस्ते येथे गणपती विसर्जन घाट बांधून देण्याचे आश्वासन दिले. आमदार निकम हे या घाटासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कळंबस्ते परिसरातील नागरिकांसाठी गणेश विसर्जनाच्या वेळी सुरक्षित आणि सुविधायुक्त घाटाची आवश्यकता आहे. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नियोजन मंडळ अधिकारी, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, जयंतशेठ खाताते, विठ्ठल कुलकर्णी, नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.
--------
कोकण कृषी विद्यापीठात
संयुक्त कृषी संशोधन बैठक
दापोली ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्यावतीने संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२६ आयोजित केली आहे. ही बैठक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या उद्घाटनासाठी कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, तुषार बाळासाहेब पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद महासंचालक राहुल महिवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
---------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालयात
राजे उमाजी नाईक जयंती
रत्नागिरी ः आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या अभिवादन कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.