माझा आवाज बंद करणारा
या धर्तीवर पैदा झालेला नाही
उदय सामंत ः ‘मनसे’ला दिले खुले आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : साळवी स्टॉप येथील दहीहंडी उत्सवात साउंड सिस्टीमच्या आवाजावरून रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) थेट आव्हान दिले. मंत्री सामंत भाषण करत असताना साउंड सिस्टीमचा आवाज वाढवत त्यांचा आवाज दाबल्याचा प्रयत्न झाला. यावर त्यांनी उत्तर दिले, माझा आवाज बंद करणारा अजून या धरतीवर पैदा झालेला नाही! आतापर्यंत मी पाचवेळा अनेकांची साउंड सिस्टीम बंद पाडली आहे. तुम्ही आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक तरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणा, मग तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, अशा कडक शब्दांत ‘मनसे’चा समाचार घेतला.
या जाहीर इशाऱ्यामुळे गोविंदांच्या थरांसोबतच रत्नागिरीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे थरही चांगलेच तापले आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात धार्मिक उत्साहापेक्षा राजकीय कलगीतुऱ्यानेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. उत्सव साजरा करताना शहरात निर्माण झालेले राजकीय वातावरण आणि नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे हा गोपाळकाला चांगलाच तापल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला गोविंदांच्या थरांचा जल्लोष सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोकाची राजकीय चुरस थेट स्टेजवरून दिसून आली.
शहरातील साळवी स्टॉप येथे मोटारमालक असोसिएशनतर्फे आयोजित दहीहंडी सोहळ्यात पालकमंत्री सामंत हे भाषणासाठी उभे राहिले. पालकमंत्री माईक हातात घेऊन बोलू लागताच अगदी समोरच असलेल्या ‘मनसे’च्या व्यासपीठावरून साउंड सिस्टमचा आवाज अचानक वाढवण्यात आला. आपल्या भाषणात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न पाहून मंत्री उदय सामंत संतप्त झाले. त्यांनी संयम सोडत थेट रोखठोक भाषेत विरोधकांना सज्जड दम भरला. रत्नागिरीतील या दहीहंडीच्या निमित्ताने झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकाच शहरात समोरासमोर झालेल्या या दहीहंडी सोहळ्यामुळे आणि नेत्यांच्या या जाहीर फैरींमुळे यंदाचा हा सण संस्कृतीपेक्षा राजकीय वर्चस्वाच्या लढाईसाठीच अधिक चर्चेत राहिला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.