युजीसी नीट परीक्षेसाठी
प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी ः राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे आयोजित युजीसी नीट परीक्षा संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रावर ९ आणि १० सप्टेंबरला सकाळी ८ ते ७ या वेळेत घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी भारतीय नागरिक सुरक्षासंहिता, २०२३च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू केले आहेत. परीक्षाकेंद्राच्या परिसरात परीक्षार्थी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून शांततेला बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यास सक्त मनाई राहील. दुकान व सेवा बंद, उपकरणांवर निर्बंध, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला अथवा वाहनाला परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण करण्यास बंदी राहील.
--------
पोफळीच्या मल्लांचा
कुस्ती स्पर्धेत दबदबा
चिपळूण ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित चिपळूण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, पोफळीच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत विविध वजनीगटांत यश संपादन केले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर प्रशालेच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षे मुलांच्या गटात ३५ किलो वजनीगटात शुभम ढेबे तर ४१ किलो गटात रूद्र माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अविनाश माने याने ४१ किलो गटात तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात ३३ किलोमध्ये द्रीती चिपळूणकर आणि ४२ किलोमध्ये स्पृहा सरक यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. १७ वर्षे मुलींच्या गटात ५७ किलो वजनीगटात शमिका पवार हिने प्रथम क्रमांक मिळवला. गार्गी मोरे हिने ५३ किलोमध्ये द्वितीय तर श्रद्धा जाधव हिने ४३ किलोमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलांच्या ४५ किलो गटात अजमत सय्यद याने तृतीय क्रमांक पटकावला.
------------
घरडा इन्स्टिट्यूटमध्ये
मोफत दंत, नेत्रतपासणी
चिपळूण ः घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी मोफत दंत व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेत्रतपासणीसाठी इन्फिगो आयकेअरच्या डॉ. स्नेहा माने व डॉ. मंदार मुखनाथ यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. दंत तपासणीसाठी खेड येथील योगिता डेंटल हॉस्पिटलच्या येथील डॉ. सलमान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. सहभागींना दातांची स्वच्छता, तोंडाचे आरोग्य व नियमित दंततपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात १०६ विद्यार्थी व प्राध्यापकांची दंततपासणी तर २३६ विद्यार्थी व प्राध्यापकांची नेत्रतपासणी करण्यात आली.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.