चिपळुणात सहकारातील कार्यकर्ते घडताहेत
स्वप्ना यादव ः सुभाषराव चव्हाण यांची प्रेरणा फलदायी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या सहकार क्षेत्रातील ५० वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाचा गौरव करताना त्यांच्या सहवासातून अनेक कार्यकर्ते व सहकारी घडल्याची भावना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी व्यक्त केली.
चव्हाण यांच्या सहवासात राहून काम करण्याची, समाजाशी जोडून घेण्याची आणि जबाबदारीने पुढे जाण्याची शिकवण मिळाली. त्यांच्या तालमीत घडलेले आम्ही सर्वजण संस्थेची वाटचाल सक्षमपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे यादव यांनी सांगितले.
चिपळूण नागरीच्या सहकार भवन सभागृहात सहकार मेळाव्यात यादव म्हणाल्या, बदलत्या सहकार क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर कायदे, संस्थेचे कामकाज आणि महिलांना मिळणाऱ्या संधी याबाबत सभासदांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात.
कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी झपाटून काम करणे हे चव्हाण यांचे वैशिष्ट्य आहे. सातत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते, असे सांगून यादव म्हणाल्या ‘आपली माणसं, आपली संस्था’ हे ब्रीद प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरत असून, संस्थेचे सुमारे १ लाख ५१ हजार ६७ सभासदांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.
---