स्ट्रोक अन् हृदयविकार
जागरूकता शिबिर
रत्नागिरी ः आजच्या व्यस्त आणि ग्रस्त जीवनशैलीतील हृदयविकार ही समस्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत जोडली गेली आहे. स्ट्रोक आणि हृदयविकार होण्यापूर्वीच कोणती जागरूकता घ्यावी यासाठी विशेष आणि अनोखे असे जनजागृती शिबिर एसएम जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयाने रत्नागिरी येथे आयोजित केले होते. या वेळी डॅा. राजेंद्र कशेळकर, कॉलेज डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये आदी उपस्थित होते. आरोग्यक्षेत्रात फिजिओथेरपीचे महत्व अत्यंत वाढत आहे. उत्तम हायटेक फिजिओथेरपिस्टच्या मदतीने अनेक अवघड शस्त्रक्रिया टाळल्या जाऊ शकतात, असे तज्ज्ज्ञांचे मत आहे. या शिबिरात रक्ततपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, हार्टरेट, रेस्पिरेटरी आदी तपासण्या करण्यात आल्या.
प्रारूप मतदार यादी जाहीर
रत्नागिरी ः विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत ३१ ऑगस्टला विधानसभा मतदार संघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. याद्या जाहीर झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या कालावधीत नवमतदारांना तसेच मतदार यादीतील पत्त्यावर हजर नसलेल्या किंवा अन्यत्र स्थलांतरित झाल्याने नाव समाविष्ट होऊ शकले नाही, अशा नागरिकांना आपल्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणावरून प्रपत्र-६ व त्यासोबत घोषणापत्र भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची संधी आहे. दावे व हरकती दाखल केल्यानंतर त्याबाबतच्या याद्या संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून सूचनाफलकावर प्रदर्शित केल्या जातात व सात दिवसांच्या कालमर्यादेनंतर त्या अनुषंगाने निर्णय घेतला जातो. चालू असलेल्या एसआयआरमधील दावे किंवा हरकती दाखल केल्यापासून सात दिवसांच्या कालावधीतील तपशील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ‘Claims and Objections during SIR-२०२६’ या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शासकीय रक्तपेढीत
रक्ताचा तुटवडा
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, रुग्णांसाठी रक्ताची मागणीही वाढली असून, त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर आवश्यक रक्त उपलब्ध करून देताना रक्तपेढीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील रक्तपेढीमार्फत रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे. निरोगी व रक्तदान करण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी शक्य तितक्या लवकर रक्तदान करावे, अशी विनंती रक्तपेढीमार्फत करण्यात आली आहे. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डेंगी तसेच इतर आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी समाजातील अधिकाधिक रक्तदात्यांनी या जीवनदायी सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.