जिल्हा परिषदेच्या १३१ शाळा झाल्या बंद
पाच वर्षातील स्थिती; पटसंख्या १७ हजार ६३४ ने घटली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद शाळांमध्ये १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची घट झाली असून, पटसंख्येअभावी १३१ शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.
शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २ हजार ४९४ शाळांमध्ये ७३ हजार २३१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. ही संख्या २०२२-२३ मध्ये ६८ हजार ५७०, २०२३-२४ मध्ये ६३ हजार ९१०, २०२४-२५ मध्ये ६० हजार ९२३ तर २०२५-२६ मध्ये घटून थेट ५५ हजार ५९७ वर आली आहे. तसेच शाळांची संख्या २ हजार ४९४ वरून २ हजार ३६३ वर आली आहे. अवघ्या पाच वर्षांत विद्यार्थीसंख्येत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली असून, १३१ शाळा कमी झाल्या आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, या दृष्टीने जिल्हा परिषदेने शाळा सुरू केल्या होत्या. जि. प. शाळांमध्ये उत्तम शिक्षक उपलब्ध आहेत व शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात. तरीही पालकांची पसंती खासगी शाळांनाच मिळत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. घटत्या पटसंख्येबाबत बोलताना, "अद्याप पहिलीचे प्रवेश सुरू असून, अंतिम पटसंख्येत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे," असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी आणि पालकांचा कल पुन्हा सरकारी शाळांकडे वाढवण्यासाठी दर्जेदार शिक्षणासोबतच आधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण, इंग्रजी संभाषण कौशल्य, क्रीडा सुविधा, स्वच्छतागृहे आणि आकर्षक वर्गखोल्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
चौकट
63289
पाच वर्षांतील विद्यार्थीसंख्या
वर्ष विद्यार्थीसंख्या
* २०२१-२२ ७३,२३१
* २०२२-२३ ६८,५७०
* २०२३-२४ ६३,९१०
* २०२४-२५ ६०,९२३
* २०२५-२६ ५५,५९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.