ई-पिक पाहणीतील अडचणी सोडवू
आमदार शेखर निकम ः सावर्डेत आंबा, काजू व खरीप पिकांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १३ ः चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आंबा, काजू आणि खरीप पिकांसंदर्भातील पीक विमा व ''ई-पिक पाहणी''तील तांत्रिक त्रुटींमुळे कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, चिपळूणचे तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, संगमेश्वरचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, कार्यालयीन कृषी अधिकारी भिमाशंकर कोळी, विमा कंपनीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रतिकेश शिगवण, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम आणि रत्नागिरी जिल्हा दिशा समितीचे सदस्य शेखर उकार्डे उपस्थित होते. या बैठकीत प्रधानमंत्री फसल विमा योजना व ई-पिक पाहणीतील त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार निकम यांनी कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठोस कार्यवाहीचे निर्देश दिले. आंबा, काजू, सुपारी व नारळ ही बहुवर्षायू फळपिके असल्याने त्यांची नोंद दीर्घ कालावधीसाठी (अनेक वर्षांसाठी) एकदाच ग्राह्य धरण्याबाबत शासनाकडे शिफारस केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पोटखराब जमिनीत प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्राचा विचार करून तेथील पिकांना विमा छत्र मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करताना स्थानिक परिस्थिती व प्रत्यक्ष नुकसानाचा अचूक अंदाज घेतला जावा; तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीचे निकष अधिक व्यावहारिक केले जावेत. तर भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या कागदपत्रांच्या अडचणी सुलभ करण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट
शेतकऱ्यांना माहिती द्या
मोबाईल क्रमांक बदलणे किंवा डिजिटल प्रक्रियेची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर मदत उपलब्ध करून द्या, अशा सूचना आमदार निकम यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.