आठवणीतला गणेशोत्सव - लोगो
इंट्रो
खरंच धन्य तो गणपतीराया आणि धन्य ते बालपण! माझ्या आठवणीतला गणेशोत्सव आता खरोखर आठवण म्हणूनच राहिला आहे. ३० वर्षापूर्वीच आमचं बालपण. गणपती सप्टेंबरमध्ये येणार हे कानावर येताच मन भरून यायचं. कधी तो दिवस उगवणार? मनाला हुरहूर लागायची. आईला सारखं विचारायचं, ‘‘आई, आपला गणपती कधी येणार? आपल्याकडे मग काय काय असणार? शाळेला सुट्टी किती दिवस मिळणार? ’’ तसं गणपती येणार म्हणून आई-बाबांचा अभ्यास कर म्हणून घोषा नसायचा, ओरडा नसायचा त्यामुळे या सणाची मज्जा काही औरच कशी असे त्या आठवणींचा गहीवर.
- सौ. योगिता सुजित शिंदे, नाखरे, रत्नागिरी
-----------------------------------
आजही तो गणेशोत्सव हृदयापाशी
गणा माझ्या बालपणी, होत्या वाटा आडवळणी
कोसो मैल दूर चालूनी, दगड धोंडे काट्यातूनी
त्या वाटेने माझ्या वडिलांनी, आणले तुला अनवाणी......
विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल लागताच होणारी विशेष लगबग म्हणजे प्रामुख्याने घर झाडणे. गणपतीत आपले घर चकाचक असावे म्हणून एक कोळीष्टक आम्ही ठेवायचो नाही. सर्व भांडी लखलखीत. पितांबरी मिळाली तर मग काय विचारता? खिडक्या, दारे पुसणे, पडदे, तोरणे पिशव्यातून बाहेर काढणे नुसती पळापळ. सर्वांच्या अंगणात सारवण. शेणसड्यातून हवाहवासा सुटणारा वास आजही स्मरणात आहे.
गणपतीच्या निमित्ताने आई बाबांकडून नवीन कपडे, काका काकूनी आणलेला भरपेट खाऊ. मज्जाच मज्जा! गणेशाच्या आगमनाचा दिवस म्हणजे रात्रभर जागून डेकोरेशन करायचं, हातावर मेहंदी काढायची, आपली आरास झाली की, शेजाऱ्यांना मदत. पीठ मळा, मोदक वळा, केळीची पाने शोधा, किती ती गडबड! खूप खूप मजा यायची. पडदा लावताना मोठ्या दादाचा ओरडा, हे करू नको, त्याला हात लावू नको, हे असं कर अशा नाना सूचना तसेच बाबा, काका, दादा शेजारी असे सर्व मिळून गणपतीच्या आगमनाची तयारी करायचे. सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायची, नवीन कपडे घालायचे, डोक्याला मोरया..मोरयाची पट्टी बांधायची, कपड्याला अत्तर लावायचे, हातात मोठा पाट घेऊन गणपती आणायला जायचे. मोठा जोश असायचा. पावले भराभर पडायची.महत्त्वाचं म्हणजे अनवाणी असून सुद्धा!
गणपती घरी आणताना गाणी म्हणायची, गजर म्हणायचा. गणपती घरी आला की, मीठभाकरीने त्याची दृष्ट काढण्यासाठी आईची लगबग,ज्याच्या डोक्यावर गणपती त्याची पायधुणी केल्यावर पाणी ओतून घेण्यासाठी आमची धडपड,ओवाळणी झाल्यावर बाप्पाला मखरामध्ये सांभाळून बसवायचं. '' मंगलमूर्ती मोरया '', ''उंदीर मामा की, जय'' म्हणताना आम्हां मुलांची चढाओढ असे.
गणपतीची पूजा करताना २१ मोदकाचा नैवेदय दाखवायचा आणि आपण सुद्धा भरपेट मोदक खायचे. आरासकडे मांजर जाणार नाही ना? पुढ्यात अगरबत्ती आहे ना? तुपाचा दिवा तेवत आहे ना? आपल्याकडे आलेल्या गणेशभक्तांना प्रसाद द्यायचा हे मी हटकून पाही. किती तो आनंद! मन भारावून जायचं ; पण आता ते दिवस राहिले नाहीत. झगमगाट वाढला, मी - तू पणा आला, मराठी - इंग्रजी मीडियममुळे सुट्ट्याचा मेळ लागत नाही अशा समस्या जाणवत आहेत तरीही गणपतीच आगमन, त्याच्या वास्तव्याचे दिवस आजही भूतकाळात नेतात. हृदयाशी जपलेल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि आठवणीतला तो माझा लाडका गणपती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.