rat१४p१६.jpg-
६३८६३
गोमय गणेशमूर्ती
-rat१४p१७.jpg-
६३८६४
राजापूर ः प्रशिक्षणामध्ये महिलांनी बनविलेले गोमय गणेशमूर्ती
-----------------
गोमय गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा जागर
परंपरा, श्रद्धा अन् पर्यावरणाचा संगम ; दशकभरापासून पंडित, आंब्रे यांचे प्रयत्न
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः गणेशोत्सवातील श्रद्धा आणि भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत गोमय गणेशमूर्तींचा पर्याय पुढे येत आहे. देशी गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, पीओपीला पर्याय म्हणून त्यांचा प्रचार केला जात आहे. कोकणचे सुपुत्र पंचगव्य चिकित्सक सुहास पंडित आणि योगेश आंब्रे गेल्या दशकभरापासून प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून गोमय गणेशमूर्तीची संकल्पना समाजमनात रुजविण्याचे काम करत आहेत.
पूर्वी गणेशमूर्ती प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून तयार केल्या जात. मात्र, शाडूची माती उपलब्ध होण्यातील मर्यादा आणि वाढती किंमत यामुळे गणेशमूर्तींसाठी पर्यायी माध्यमांचा विचार होऊ लागला. पीओपीच्या मूर्ती अधिक सुबक आणि सहज तयार होत असल्या तरी विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर गोमय गणेशमूर्ती हा पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.
देशी गायीचे शेण सुकवून त्याची पावडर तयार केली जाते. त्यामध्ये प्रीमिक्स मिसळून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण साच्यांमध्ये हाताने भरून गणेशमूर्ती घडविली जाते. मूर्तीला उठावदारपणा देण्यासाठी केमिकलविरहित नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. एक फूट उंचीची मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे दोन किलो शेण व प्रीमिक्स लागते.
हाताने एक मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागतात. यंत्राच्या सहाय्याने एका तासात सुमारे २० मूर्ती तयार करता येतात. मूर्ती सुकण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात. एक फूट उंचीची गोमय गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सुमारे ७०० ते ८०० रुपये खर्च येतो, अशी माहिती योगेश आंब्रे यांनी दिली. गोमय गणेशमूर्तींच्या माध्यमातून गणेशोत्सवातील श्रद्धा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंडित पंचगव्य गुरुकुल, राजापूरचे प्रमुख सुहास पंडित आणि गुणदे-गणवळ (ता. खेड) येथील योगेश आंब्रे यांच्या प्रयत्नांतून या उपक्रमाचा प्रसार होत आहे.
---------
चौकट
गोमय गणेशमूर्तींना पसंती वाढण्याची गरज
पर्यावरणपूरक आणि सहज विसर्जन करता येणाऱ्या गोमय गणेशमूर्तींचा पर्याय उपलब्ध असला तरी त्यांना अद्याप भक्तांकडून अपेक्षित प्रमाणात पसंती मिळताना दिसत नाही. शाडूच्या मातीच्या मूर्तींच्या तुलनेत गोमय मूर्तींची किंमत अधिक असल्यानेही काही प्रमाणात मर्यादा येतात. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या मूर्तींचा अधिकाधिक प्रसार होण्याची गरज आहे.
----------
चौकट
हायड्रॉलिक प्रेस मशीन बनविण्यासाठी प्रयत्नशील
गोमय गणेशमुर्ती तयार करण्यासाठी शेणाची पावडर हाताने मळणे, त्यानंतर ती साच्यामध्ये भरण्यासाठी जादा मेहनत लागते. यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यावर पर्यायाचा शोध घेताना देशी गाईच्या शेणापासून मूर्ती बनवण्यासाठी यांत्रिकीकरणाचा कसा वापर करता येईल याचा अभ्यास अन् संशोधन सुरू असल्याची माहिती योगेश आंब्रे यांनी दिली. याबाबत डायमेकरशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हायड्रॉलिक प्रेस मशीन बनवून त्याच्या सहाय्याने सुबक गोमय गणेशमुर्ती बनविणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मशीनच्या सहाय्याने शेणाची पावडर करणे, शेण मळणे आदी कामे करणे शक्य होणार असून मशीनमध्ये मळलेली शेणाची पावटर टाकल्यावर ठराविक दाबाने एका तासाला २५ सुबक मूर्ती बनविता येणार आहेत. मात्र, हायड्रॉलिक प्रेस मशीन बनविण्यासाठी सुमारे ३० लाख रूपयांची आवश्यकता असून हा निधी उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
पंडीत पंचगव्य गुरूकूल येथे पंचगव्य चिकित्सा आणि राजस्थान येथे गोमय गणेशमुर्ती अन् प्राकृतिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर, देशी गायीच्या शेणापासून तयार होणार्या गोमय गणेशमुर्तीचे महत्व पटवून देण्यासाठी गेल्या दशकभरापासून प्रयत्नशील आहोत. गेल्या तीन वर्षांमध्ये चिपळूण, खेड व कणकवली तालुक्यातील महिला बचत गटातील १६० पेक्षा जास्त महिलांना गोमय गणेश मूर्ती व इतर शोभेच्या वस्तू बनविणे, गोमुत्रापासून वस्तू बनविणे याचे प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे आदी ठिकाणी गोमय गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
- योगेश आंब्रे, पंचगव्य चिकित्सक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.