कोकण

....यावर्षी सांभाळून घे रे, गणराया!

CD

आठवणीतला गणेशोत्सव-----------लोगो

इंट्रो

गणेशोत्सव म्हटला की, कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण! पोटापाण्यासाठी गावापासून दूर असलेला चाकरमानी गणपतीत आवर्जून गावाला येतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात एखाद्या वर्षी ब्रेक घ्यावा लागतो, तर कधी गडबडीत का होईना पण एखादा दिवस उपस्थिती दर्शवावी लागते. नाहीच जायला मिळाले तर मग आठवणीच उराशी जपतो, कुढत राहतो. मनातल्या मनात ''यावर्षी सांभाळून घे रे, गणराया!'' गाऱ्हाणे घालतो. गणेशोत्सवात आधुनिक काळात झालेले बदल आणि जुन्या चालीरीती, परंपरा यांचा मेळ घालताना आम्ही अनुभवलेल्या गणेशोत्सवाच्या बालपणीच्या असंख्य आठवणी आपसूकच डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

महेश बंडबे, भडे, लांजा
--------------
....यावर्षी सांभाळून घे रे, गणराया!

आताचा गणेशोत्सव आणि आमच्या वेळचा गणेशोत्सव यात खूप फरक असला तरी श्रद्धा मात्र तशीच आहे. ८० ते ९० च्या दशकात आतासारखे देखावे, रंगीबेरंगी लाईट अशी काहीच सोय नव्हती. तयारी मात्र महिनाभर आधीच चालू व्हायची. आम्हा लहानग्याची वेगळीच धमाल असायची, ती म्हणजे घरातील खळात सायली बनवण्याची. सुतगुंडीतील सुताचे एक टोक खिळ्याला अथवा कोणाच्या तरी बोटात अडकवायचं आणि दुसऱ्या टोकाला जुन्या छत्रीच्या तारेला फुकणीत (चुलीतील लाकडे पेटण्यासाठी फुकतात ते साधन) घालून दोऱ्याच्या मध्ये कागद घालायचा. फुकणीतल्या तारेला फिरवल्यावर कागदाला पिळ पडला की सायली तयार! अशा सायलीचे फुटबॉलच्या आकाराचे बॉल बनवायला आम्हा लहानग्यांना खूपच मजा यायची.
गणपतीला मखरात बसवायला लागणारा टेबल मराठी शाळेतून आणावा लागायचा. हरतालिकेच्या आदल्या दिवशी शाळेला सुट्टी पडली की, टेबल आणून मग मखराला सुरुवात व्हायची. चार बाजूंना जुने पडदे, पाठीमागे रंगीत पडदा, वरती कवडळ, हरणफुले, सोनतळ, तिरडा यांचा गुच्छ आणि मध्यभागी भाताची लोंब; जोडीला असलीच तर दोन-चार प्लास्टिकची जुनी एकाच रंगाची फुले किंवा फुलांच्या माळा! टेबलावर एक जाडजूड गोणता, त्याच्यावर पांढरेशुभ्र धोतर, त्यावर मूठभर तांदूळ, गणपतीचा पाट अन् पाटावर गणपती!
जागरण करून गणपतीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून फुलांची जमवाजमव करावी लागे. प्रत्येकाच्या घरी गणपती असल्याने कधी कधी आपल्या बागेतील फुले दुसरेच घेऊन जायचे; पण कोणीच काही बोलायचे नाही. बऱ्याचदा बाबा गणपतीचा पाट घेऊन गणेश चित्रशाळेकडे निघायचे. त्यांच्या मागे आम्ही घरातील चिल्लीपिल्ली छत्र्या, विडा-पान घेऊन चालायचो. दुसऱ्या गावातून मूर्ती आणायची असेल तर आदल्या दिवशी ती आणून देवघरात वर्तमानपत्र टाकून झाकून ठेवतो. गणेश चित्रशाळेत गेल्यावर मात्र वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती बघायला मिळायच्या. जास्वंदीच्या फुलातील गणपती, उंदरावरील गणपती, शंख, गरुड, गायगणपती, कालियामर्दन अशा दृश्यांतील मूर्ती पाहून भान हरखून जायचे. विशेष म्हणजे गणपती शाडूच्या मातीने हाताने काढलेले असायचे.
विडासुपारी पाटावर ठेवून पैसे दिले की, गणपती डोक्यावर घेऊन पाठी न पाहता सरळ घराची वाट धरायची. घरी पोहोचताच मीठ-मोहरीने आई बाप्पाची नजर काढायची. गणपती पूजेला लागला की, पुढ्यात काकडी, चिबूड, नारगा (काकडीचा गोलाकार प्रकार) यांची रेलचेल असायची. तेव्हा प्रत्येकाच्या खळात काकडी, पडवळ, घोसाळी, तोवसा यांचा मांडव असायचा. शेताच्या बांधावर, वरंड्यावर चिबूड, काकडी, भोपळा यांचे वेल असायचे. नैवेद्यासाठी खळात खास भेंडी, लाल माठ लावलेली असायची. देवपूजा, नैवेद्य झाल्यावर जाकडी घेऊन ग्रामदैवत सोमेश्वर, आई जाखादेवी चरणी मान व्हायचा. पहिल्याच दिवशी ब्राह्मण वटारातील घरे घेता घेता संध्याकाळ व्हायची. नंतर घरी येऊन वाडीत आरतीला जाणे, मिळालेला प्रसाद साठवून शेवटच्या घरात एकत्रित वाटून खाणे यात एक वेगळीच मजा असायची!
आरती संपली की, रात्री कोणाकडे तरी भजनाचा प्लॅन असायचा. त्यामध्ये आम्हाला भजन गायला तर कधी ढोलकी, टाळ वाजवायला मिळायचा. कधी एखाद्या गावात आमची जाकडीची एकेरी बारी असायची. जीव तोडून कला सादर करायचो. एखाद्या घरात फरसाण, पोह्यांचा छान नाश्ता व्हायचा. तहान-भूक विसरून गणरायाच्या जल्लोषात आम्ही नाचत राहायचो. नाचताना कोणी १० रुपयांची नोट नाचणाऱ्याच्या पोशाखाला लावली की, नाचायला नुसता जोश यायचा. पाच-सहा दिवस अगदी खूप मंतरलेले असायचे. त्यात कधी पंचक्रोशीत शक्तीतुऱ्याची डबलबारी असेल तर हटकून जायचे. गौरीच्या दिवशी मात्र कुठे जायचे नाही; कारण त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गौरीला लागणारा नैवेद्य, मांसाहारी जेवण करून वाडीतील गणपतीच्या घरी जाऊन नाचण्याचा रिवाज असे.
या सगळ्यात विसर्जनाचा दिवस कधी यायचा ते समजायचे देखील नाही. त्यादिवशी संध्याकाळी चार वाजता गणपती मखरातून बाहेर काढून होळीच्या मांडावर वाडीतील सगळ्यांचे एक एक करून गणपती यायचे. एका रांगेत एकामागून एक गणपती, पाठीमागे गौरी. त्या अत्यंत सुंदर विलोभनीय दृश्याने डोळ्यांचे पारणे फिटायचे. शेवटी आरती, नाच करून पाण्याच्या कोंडीमध्ये विसर्जन व्हायचे. विसर्जनाअंती मिळणारा प्रसाद खाण्यात वेगळीच मज्जा वाटे. कोणी खोबरे शोधायचे, कोणी सफरचंद! दहीभात अन् पालक भाजीचा नैवेद्य घेण्यासाठीही झुंबड उडे. शेवटी घरी आल्यावर गणपतीच्या पाटावरून आणलेले खडे घरावरती शिंतडायला केवढा आनंद वाटायचा, म्हणून सांगू !
आता गणेशोत्सव सणातील साधेपणा लोप पावला आहे. काळाबरोबर चालताना, आधुनिकता स्वीकारताना गणेशभक्तांच्या मनातील भक्तिभाव, श्रद्धा, माणुसकी, आपुलकी यांना सदैव जागृत ठेवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT