चौविस वसतिगृहांचे होणार सुरक्षा ऑडिट
विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी निर्णय; खिडक्यांना जाळ्या, बंकर बेड, सीसीटीव्हीची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : जिल्हा परिषदेच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. सर्पदंश आणि विंचूदंशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहांमध्ये लोखंडी बंकर बेड बसविणे, खिडक्यांना लोखंडी जाळ्या लावणे आणि परिसरात स्वच्छता राखणे बंधनकारक केले आहे. या अनुषंगाने समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे यांनी जिल्हा परिषदेत वसतिगृह अधीक्षक आणि संचालकांची बैठक घेतली. जिल्ह्यातील सर्व २४ वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश यावेळी दिले.
वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविणे, बंकर बेडची सुरक्षित मांडणी करणे तसेच परिसरातील धोकादायक झाडे-झुडपे हटवून स्वच्छता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय परिसरात फवारणी करणे आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेच्या ४० टक्के राखीव निधीतून आर्थिक तरतूद केली जाणार आहे. या निधीतून प्राधान्याने खिडक्यांना जाळ्या बसविणे आणि बंकर बेड खरेदी करण्याची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
वसतिगृहांमध्ये जमिनीवर गाद्या टाकून झोपणाऱ्या विद्यार्थ्यांना साप आणि विंचू चावण्याचा धोका अधिक असतो. लोखंडी बंकर बेडमुळे विद्यार्थ्यांना जमिनीपासून उंचावर झोपता येईल. त्याचबरोबर उपलब्ध जागेचा योग्य वापर होऊन स्वच्छता राखणेही सोपे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व २४ वसतिगृहांमध्ये खिडक्यांना जाळ्या बसविणे, बंकर बेड उपलब्ध करून देणे, परिसरात औषध फवारणी करणे आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी करणे या चार प्रमुख कामांवर ४० टक्के निधीतून भर दिला जाणार आहे.
चौकट १
....तर कारवाई करू !
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राथमिक जबाबदारी असून, शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या वसतिगृह चालकांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही कांबळे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.