यूपीआय बंदचा चिपळूणमधील १३ पंपांवर परिणाम
१५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; रोख रक्कम बाळगावी लागणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : दोन हजार रुपयांहून अधिक रकमेच्या ‘पर्सन-टू-मर्चंट’ (पीटूएम) यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के व्यापारी सवलत दर (एमडीआर) लागू करण्याच्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारकडून सवलत न मिळाल्यास १५ ऑक्टोबरपासून यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे चिपळूणमधील वाहनचालकांनाही रोख रक्कम जवळ बाळगावी लागणार आहे.
चिपळूण शहर व परिसरात सुमारे १३ पेट्रोल-डिझेल पंप आहेत. प्रत्येक पंपावर दररोज दोन हजार रुपयांहून अधिक रकमेचे अनेक यूपीआय व्यवहार होतात. डिजिटल पेमेंटची सवय झालेल्या ग्राहकांना सुविधा बंद झाल्यास गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर पंप चालकांचे थेट नियंत्रण नसते. मिळणाऱ्या मर्यादित कमिशनमधून कामगारांचे वेतन, वीजबिल, देखभाल तसेच इतर परिचालन खर्च भागवावे लागतात. त्यामुळे यूपीआय व्यवहारांवर एमडीआर लागू झाल्यास अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल, असे पंप चालकांचे मत आहे.
चौकट १
चिपळूणमधील इंधन विक्री
- पेट्रोल पंप : १३
- दररोज पेट्रोल विक्री : सुमारे २५ हजार लिटर
- दररोज डिझेल विक्री : सुमारे ५२ हजार लिटर
- पेट्रोलवरील कमिशन : प्रतिलिटर सुमारे ३ रुपये
- डिझेलवरील कमिशन : प्रतिलिटर सुमारे २ रुपये
- दररोज दोन हजारांहून अधिक रकमेचे यूपीआय व्यवहार : प्रत्येक पंपावर
कोट
एका लिटर पेट्रोलमागे सुमारे तीन रुपये आणि डिझेलमागे दोन रुपये कमिशन मिळते. त्यातून कामगारांचे पगार, वीजबिल, देखभाल आणि अन्य खर्च भागवावे लागतात. गेल्या काही वर्षांत खर्च वाढले आहेत; मात्र कमिशनमध्ये त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे दोन हजार रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर एमडीआरचा अतिरिक्त भार पंप चालकांसाठी अडचणीचा ठरेल. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपांना या शुल्कातून पूर्ण सूट मिळणे आवश्यक आहे.
- रामशेठ रेडीज, पेट्रोल पंप चालक, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.