- rat२१p१२.jpg-
26O65369
रत्नागिरी ः खेडशी येथील व्यसनमुक्ती सेवाकेंद्रातील सार्वजनिक गणेशोत्सवात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक स्मिता सुतार. शेजारी मान्यवर.
----
स्मार्टफोन वापरताना ज्येष्ठांनी सतर्क राहावे
स्मिता सुतार ः खेडशी येथे ‘लोकसंवाद’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः ‘सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी त्यासोबत सायबर गुन्हेगारीचे मोठे संकटही उभे राहिले आहे. स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे,’ असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवाकेंद्र खेडशी येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी बाळसत्याधारी महाराज, मिरजोळेचे उपसरपंच राहूल पवार, माय भारतचे जिल्हा युवाधिकारी सम्राट पाटील, खेडशीचे माजी सरंपच भिकाजी गावडे, उद्योजक अरविंद माने, मुख्याध्यापक सुभाष पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद २०२६ याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुतार यांनी सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्या उलगडून दाखवल्या. त्या म्हणाल्या, अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नका. एका क्लिकमुळे तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँकखात्यांची माहिती, वैयक्तिक छायाचित्रे आणि आधारकार्डसारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून बनावट खाती सुरू केली जातात किंवा आर्थिक फसवणूक केली जाते.
या कार्यक्रमात सुतार यांनी डिजिटल अरेस्ट, बनावट पोलिस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गॅसबिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंगविषयी रत्नागिरी व परिसरातील घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन माहिती दिली. अशा कोणत्याही धमक्यांना किंवा आमिषांना बळी न पडता कुटुंबीयांशी संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी दिला.
---
या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून (फ्रीझ करून) वाचवता येऊ शकेल, असेही सुतार यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे, हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरूकिल्ली असल्याचे सुतार यांनी अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.