26O65569
एआय चित्र
चाकरमान्यांच्या परतीला जुन्या बसगाड्या
चिपळूण आगारातील चित्र ; गणेशभक्तांना नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा कायम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः गणरायाला निरोप दिल्यानंतर मुंबई, ठाणे आणि पुण्याकडे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, त्याचा भार चिपळूण आगारावर पडत आहे. त्यामुळे चिपळूण आगाराकडून मुंबईकडे जाणाऱ्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी जुन्या बसगाड्यांचा वापर करण्यात आला असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाण्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त वाहतुकीचे नियोजन केले. यंदा एसटीच्या ५ हजार ७४३ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासातही प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि नव्या बसगाड्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र चिपळूण आगारातून मुंबईकडे सोडण्यात येणाऱ्या काही फेऱ्यांसाठी जुन्या बसगाड्या वापरल्या जात असल्याने प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे. गणेशोत्सवाच्या परतीच्या काळात चिपळूण आगारातून मुंबईसह ठाणे, पालघर आणि अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नियमित वाहतुकीसोबत अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करावे लागत आहे. उपलब्ध बसगाड्या परतीच्या मार्गावर वळवल्याने ग्रामीण भागातील नियमित फेऱ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
चिपळूण आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सध्या मोठी मागणी आहे. ग्रुपबुकिंग केलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र गाड्यांचे नियोजन करण्यात आले असले तरी काही प्रवाशांना जुन्या बसगाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात बसची अवस्था, आसनांची स्थिती, स्वच्छता आणि प्रवासातील आराम याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाने यंदा १३.५ टक्क्यांची कायमस्वरूपी भाडेवाढ केली आहे. भाडेवाढीनंतरही गणेशभक्तांनी एसटीला मोठी पसंती दिली. त्यामुळे चिपळूण आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या परतीच्या फेऱ्यांसाठी शक्य तितक्या नव्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
----
बसस्थानकात अस्वच्छता
चिपळूण बसस्थानकातील स्वच्छतेचाही प्रश्न या वेळी पुढे आला आहे. प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जात असतानाही बसस्थानक परिसरात अस्वच्छता असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
---
कोट १
‘कोकणातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी पुरेशा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली; मात्र परतीच्या प्रवासात जुन्या गाड्या सोडण्यात येत असल्याने ग्रुपबुकिंग केलेल्या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर शक्य तितक्या नव्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात.’
- दिलीप चव्हाण, प्रवासी, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.