चिपळूण पालिका पाणीयोजनेसाठी घेणार कर्ज
तिजोरीत खडखडाट; शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः शहराचा भविष्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या १५० कोटी रुपयांच्या ‘ग्रॅव्हिटी’ पाणीयोजनेला गती देण्यासाठी चिपळूण नगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्रकल्प सल्लागार समिती बदलली आहे. योजनेसाठी पालिकेला स्वतःचा १० टक्के म्हणजे १५ कोटी रुपयांचा वाटा उभा करावा लागणार आहे; मात्र पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा निधी शासकीय कर्जाच्या माध्यमातून उभारण्याचे नियोजन केले जात आहे. याबाबत येत्या ५ तारखेला होणाऱ्या पालिकेच्या विशेष सभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात चिपळूण शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यातच कोयना धरणातील पाणीसाठाही पुरेसा नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ किलोमीटर लांबीची ग्रॅव्हिटी पाणीयोजना पूर्ण करणे अत्यावश्यक बनले आहे. या योजनेअंतर्गत कोळकेवाडी धरणातील पाणी ७ इंची पाईपलाईनद्वारे थेट चिपळुणात आणले जाणार आहे. यासाठी ‘लेक टॅपिंग’ करण्यासाठी कोयना सिंचन विभागाकडे पालिकेला ५.५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
-----
चौकट
ही आहेत योजनेपुढील प्रमुख आव्हाने
* कोळकेवाडी ते पिंपळीदरम्यान जलवाहिनीचे काम मार्गी लागले असले तरी पिंपळी ते खेर्डीतील साठवण टाकीदरम्यान जलवाहिनी टाकणे आव्हानात्मक आहे. खेर्डी बाजारपेठेतून मार्ग काढताना मोठा खर्च व तांत्रिक अडचणी येणार आहेत.
* जलवाहिनीसाठी काही ठिकाणी जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच नागरिकांच्या घरांपर्यंत जोडणी व ''वॉटरमीटर'' बसवण्याचा खर्चही पालिकेलाच करावा लागणार आहे.
* चिपळूण पालिकेची सध्याची पाणीयोजना वार्षिक सुमारे ३ कोटी रुपयांच्या तोट्यात चालली आहे. दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करूनही पाणीपट्टीत फारशी वाढ करण्यात आलेली नाही, ज्यामुळे पालिका प्रशासनावर आर्थिक ताण पडत आहे.
-------
कोट १
चिपळूण शहराच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी ग्रॅव्हिटी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेतील सर्व तांत्रिक व आर्थिक अडथळे टप्प्याटप्प्याने दूर केले जात असून, ही योजना कोणत्याही परिस्थितीत वेळेत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे.
- संजय जाधव, मुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.