‘आठल्ये-सप्रे-पित्रे’चे
व्हॉलिबॉलमध्ये यश
देवरूखः तालुक्यातील ताम्हाणे माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या संगमेश्वर तालुकास्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने १९ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आठल्ये-सप्रे-पित्रेच्या संघाने बुरंबी महाविद्यालयाचा २-० असा सहज पराभव केला. त्यानंतर अंतिम सामन्यात निवे आश्रमशाळेच्या संघाविरुद्ध चुरशीच्या लढतीत २-१ सेटने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. या शानदार कामगिरीच्या जोरावर आठल्ये-सप्रे-पित्रेच्या संघाची जिल्हास्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या संघात कर्णधार सार्थक आडशे, उपकर्णधार वेदांत गवंडी, विजय गुरव, आर्यन पागार, आर्यन खेडेकर, तन्मय नटे, संस्कार गावडे, सिद्धेश लिंगायत, नयन लिंगायत, ओम लिंगायत, आर्यन पेंढारी आणि साईराज शेलार यांचा समावेश आहे. स्पर्धेत सार्थक आडशे आणि वेदांत गवंडी यांनी उल्लेखनीय अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
------
पंचनाम्यांसाठी सहकार्य
करा ः युवराज हांदे
लांजा ः खरीप हंगामामधील दुष्काळामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीचे शेतकरीनिहाय पंचनामे केले जात असून, एकही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी गावागावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांनी केले आहे. लांजा तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पंचनाम्यादरम्यान पिकांची प्रत्यक्ष स्थिती, क्षेत्र, छायाचित्रे, जीपीएस नोंद तसेच शेतकऱ्याची आवश्यक वैयक्तिक व बँक खात्याची माहिती अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच लांजा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, यासाठी शिवसेनेच्यावतीने केलेल्या मागणीनंतर शासनाने पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियुक्त पथकांना सहकार्य करून आपला पंचनामा, आवश्यक हमीपत्र अथवा संमतीपत्र वेळेत पूर्ण करून घ्यावे, तसेच कोणताही शेतकरी प्रक्रियेतून वंचित राहणार नाही याची पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन हांदे यांनी केले आहे.
---------
गणेशोत्सवाचा वारसा
जगभर पोहोचणार
रत्नागिरी ः रत्नागिरीच्या गणेशोत्सवाचे सांस्कृतिक वैभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपण्याचा आणि जगासमोर मांडण्याचा सुंदर प्रयत्न झाला आहे, असे कौतुगोद्गार पालकमंत्री उदय सामंत काढले. शिवसेना युवा सेना, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गणेशोत्सव रील बाज व फोटोग्राफी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी बोलत होते. या स्पर्धेचे संकल्पक अथर्व राजन साळवी, रत्नागिरी सिंडिकेट फोटोग्राफर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ही स्पर्धा फोटोग्राफी, सिनेमॅटिक रील आणि मोबाईल रील अशा तीन गटांमध्ये आयोजित केली होती. रत्नागिरीच्या या उपक्रमाचा विस्तार पुढील वर्षी मुंबईसह संपूर्ण कोकणात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर व्हावा, अशी अपेक्षा यावेळी मंत्री सामंत यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि वारसा नव्या पिढीच्या कल्पकतेतून जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन दिले जाईल, असेही सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.