68184
जुन्यांना दूरची शाळा, नव्यांना सोयीची जागा !
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मनमानी नियुक्त्यांमुळे शिक्षकांमध्ये संताप
एक नजर
* अतिरिक्त हजार शिक्षक असताना ४५० नवीन भरतीचा घाट कोणासाठी?
* ज्येष्ठ शिक्षकांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर ४५ किमीची रपेट
* शिक्षकांमध्ये तीव्र संताप
रत्नागिरी, ता. ६ : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा आणि मनमानी कारभाराचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्षानुवर्षे सेवा देऊन निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ५३ वर्षांवरील जुन्या शिक्षकांना तब्बल ४० ते ४५ किलोमीटर दूरच्या शाळांवर नियुक्ती दिली आहे तर नव्याने रूजू झालेल्या ४५० नव्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. प्रशासनाच्या या तुघलकी कारभारामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी ५३ वर्षांवरील शिक्षकांच्या वयाचा व सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना सोयीच्या शाळा देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या; मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे हे निर्देश थेट धाब्यावर बसवून स्वतःची वेगळीच व्यवस्था लावल्याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यात आधीच हजाराहून अधिक शिक्षक अतिरिक्त असताना अचानक ४५० नवीन शिक्षकांच्या नियुक्तीचा घाट का घातला गेला? जर नवीन भरती झालीच होती तर मग आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांचे समुपदेशन व समायोजन करताना सेवाज्येष्ठता, वय आणि सेवानिवृत्तीच्या निकषांची सर्रास पायमल्ली का करण्यात आली? असा खरमरीत सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. आयुष्याची ३०-३५ वर्षे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना निवृत्तीच्या दोन वर्षे आधी अशा प्रकारे दूरच्या दुर्गम भागात पाठवून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न आहे.
चौकट
अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
या प्रक्रियेमुळे शिक्षण विभागाची नाचक्की झाली आहे. आता सर्वांचे लक्ष ७ ऑक्टोबरला होणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्याकडे लागले आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? ५३ वर्षांवरील शिक्षकांवरील हा अन्याय दूर करून नियुक्ती रद्द होणार का? याकडे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट
जादाचे शिक्षक आल्यामुळे आणि एकदम संख्या वाढल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे; परंतु त्यांनी त्यावर काहीतरी उपाययोजना करतो, असे सांगितले आहे. जुने शिक्षक आहेत त्यांची सोयीच्या ठिकाणी नियुक्ती करून त्यांना न्याया दावा, अशी आमची मागणी आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करावी.
- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.