ग्राऊंड रिपोर्ट--------लोगो
-rat७p१८.jpg-
26O68378
राजापूर ः कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा.
(छाया ः स्वप्नील पड्यार, राजापूर)
---
यंदा पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्क्यांनी घटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर संभाव्य टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नदी-नाले कोरडे पडू लागल्याने वाढत्या उष्म्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर नगरपालिकेने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. सायबाच्या धरणात पाणीसाठा वाढवणे, चिखलगाव धरणातून शीळ जॅकवेलमध्ये पाणी लिफ्ट करणे, बंधारे उभारणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था, पाणीचोरीविरोधात धडक मोहीम तसेच टंचाईकाळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-राजेंद्र बाईत, राजापूर
राजापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी ‘मास्टरप्लॅन’
टंचाईपूर्व उपाययोजनांना वेग; बंधारे, टँकरसह विविध उपाययोजना, जलसाठा वाढवण्यावर भर
---
दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये उपयुक्त ठरणारा पाणीसाठा आत्तापासूनच जलस्रोतांच्या ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या येथे मुबलक पाणीसाठा व्हावा म्हणून येत्या चार दिवसांमध्ये त्या ठिकाणी झडपे टाकण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचवेळी चिखलगाव धरणाच्या येथून शीळ जॅकवेलच्या येथे पाईपलाईनद्वारे पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणी पाणीसाठा करण्याचेही नियोजन करण्यात आले. सायबाचे धरण, शीळ जॅकवेल, आंबेवाडी जॅकवेल परिसर या ठिकाणी मोठे पाच बंधारे आणि अन्यत्र तब्बल १३ वनराई बंधारे बांधून त्या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येणार आहे.
---
*अखंडित वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना
राजापूर शहराचा सायबाच्या धरणाव्यतिरिक्त शीळ जॅकवेल हा अन्य जलस्रोत आहे; मात्र, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणचा वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला बसतो. त्यामुळे या ठिकाणचा रखडलेला फिडर जोडणी आणि पाईपलाईनचे काम तत्काळ मार्गी लावण्यात येणार आहे. २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित राहावा यासाठी पालिकेचा स्वतःचा जनरेटर खरेदी करण्यात येणार असून, नदीपात्रातून पाणी खेचण्यासाठी आवश्यकतेनुसार जादा क्षमतेचा पंप खरेदी करण्याचे नियोजन आहे.
*पाणीचोरी विरोधात धडक मोहीम
उंच-सखल भौगोलिक रचनेमुळे शहरामध्ये आधीच विविध भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये अनेक भागामध्ये बेकायदेशीररीत्या मुख्य पाईपलाईनवर पंप बसवून पाणीचोरी केली जात आहे. त्याचा फटका पाणीवितरणाला बसून पाणीपुरवठा विस्कळीत होतो. अशा पाणीचोरी शोधण्यासाठी धडक शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. पाणीचोरी करणाऱ्या व्यक्तीचे दुष्काळग्रस्त स्थिती संपेपर्यंत नळसंयोजन कट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या पाणीचोरी शोधमोहीम शहरातील सर्व प्रभागांमध्ये राबवताना त्यामध्ये प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
*दुष्काळस्थितीसाठी निधीची मागणी
संभाव्य दुष्काळग्रस्त स्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांची उभारणी करण्याची आवश्यकता आहे; मात्र, पालिकेकडे सद्यःस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा विचार करता या उपाययोजना करणे निधीअभावी शक्य होणार नाही. त्यामुळे त्यासाठी शासनाकडे स्वतंत्र निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये टॅंकर पाणीपुरवठा, विहीर-बोरवेल दुरूस्ती, पंप-मोटार खरेदी, पाईपलाईन दुरूस्ती, गळती नियंत्रण उपाययोजना, तात्पुरती पाणीवितरण व्यवस्था उभारणी, बंधारे बांधणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये निधीची आवश्यकता असून, कामानिहाय अंदाजपत्रक तयार करून त्याचा मागणीसह प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे.
चौकट
दुष्काळग्रस्त स्थितीतील उपाययोजना
* सायबाच्या धरणामध्ये पाणीसाठ्यासाठी झडपे बसवणे
* शीळ जॅकवेलच्या येथे चिखलगाव धरणातून पाणी लिफ्ट करणे
* जलस्रोतांच्या येथील पाणी उपलब्धतेचे दैनंदिन पाहणी
* मुख्य जलवाहिनी, घरगुती नळजोडण्या अन् साठवण टाक्या येथील पाणीगळतीचा शोध घेणे
* पाणीचोरीविरोधात धडक कारवाई करणे
* तीव्र पाणीटंचाई काळात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन
* बोअरवेल सुस्थितीत करणे
* सार्वजनिक विहिरींतील गाळ उपसा करणे
* घंटागाडीमार्फत स्पीकरद्वारे पाणीबचतीची जनजागृती
* नैसर्गिक जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे
* विहिरी व बोअरवेलचा आपत्कालीन वापर करणे
* जलसंधारणाची महत्त्वाची कामे करणे
---
दृष्टिक्षेपात...
* दरदिवशी दरडोई पाण्याची आवश्यकता - १३५ लिटर
* दरदिवशी दरडोई पाण्याची आवश्यकता (टंचाईकाळ )- ७० लिटर
* टंचाईकाळ वगळता पाणीपुरवठा - १० लाख ८० हजार लिटर
* टंचाईकाळात होणारा पाणीपुरवठा - १० लाख २० हजार लिटर
* सायबाच्या धरणाची क्षमता - ९९ सहस्त्र घनमीटर
* शीळ जॅकवेलची क्षमता - १० लाख २० हजार लिटर
* नळसंयोजन (घरगुती आणि व्यावसायिक) - २७१३
-----------
चौकट
पाणीपुरवठ्याची मुख्य साधने ः
* कोदवली (सायबाचे धरण)
* शीळ जॅकवेल
* आंबेवाडी जॅकवेल
* रानतळे जॅकवेल
* विंधन विहिरी
* एकूण विहिरी ः १३४
* खासगी विहिरी- १२८
* नगरपालिका विहिरी ः ६
* कूपनलिका- ९६
* नैसर्गिक झरे- २
* तळी- ७
-----------
चौकट
पाण्याच्या साठवण टाक्या
साठवण टाकी*साठवण क्षमता
तालिमखाना* ८ लाख ७७ हजार लिटर
गुरववाडी* ४ लाख ७५ हजार लिटर
बंगलवाडी* १ लाख ९२ हजार
आंबेवाडी* २५ हजार लिटर
रानतळे* १० हजार लिटर
कोंढेतड* २१ हजार लिटर
ओगलेवाडी* १ लाख लिटर
प्रियदर्शनी वसाहत* ३१ हजार लिटर
पुर्नवसन वसाहत* १ लाख लिटर
खडबडशा* १ लाख लिटर
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.