‘एसआयआर’बाबत संभ्रम नको
नगराध्यक्ष सकपाळ; त्रुटींवर हरकती नोंदवा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः ‘एसआयआर’ प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना हरकत नोंदवून नाव समाविष्ट करून घेण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एसआयआर’ प्रक्रियेतून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, ही सर्वांचीच भूमिका आहे; मात्र, प्रक्रियेची वस्तुस्थिती न समजून घेता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले. बुधवारी महाविकास आघाडीने शहरात एसआयआरविरोधात मोर्चा काढल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली.
प्रारूप मतदार यादीत काही पात्र मतदारांची नावे राहिली असतील किंवा नावांमध्ये चुका असतील तर त्यावर हरकत नोंदवण्याची संधी आहे. प्रारूप यादीत नाव नसणे म्हणजे मतदाराचे नाव कायमस्वरूपी वगळले गेले, असे नाही. हरकती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जातील, असे सकपाळ यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात सुमारे २५ हजार ३०० मतदारांची नावे प्रारूप यादीत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी अंदाजे पाच हजार नावे बनावट किंवा मृत मतदारांची असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. उर्वरित मतदारांच्या नावांची पडताळणी करून पात्र मतदारांचा समावेश केला जाणार आहे. प्रारूप यादीची पीडीएफ सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत यादी तपासता आली असती; मात्र, आतापर्यंत कोणत्याही पक्षाने पात्र मतदाराचे नाव वगळल्याबाबत निवडणूक विभागाकडे अधिकृत माहिती दिलेली नसल्याचे सकपाळ यांनी सांगितले. नवीन मतदारांची नोंदणी बंद झालेली नसून, नोंदणी प्रक्रियेतील काही बदलांबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हरकत नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
---
विरोधकांनी विनाकारण होम करू नये
‘एसआयआर’च्या प्रक्रियेबाबत विरोधकांनी आधी नीट माहिती घ्यावी. प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन करावे. अपुरी माहिती घेऊन लोकांमध्ये भीती निर्माण करणे किंवा संभ्रम पसरवणे योग्य नाही, असा टोला सकपाळ यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.